- चेतन ननावरे मुंबई : राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत, परंतु तरुणाईला यात विशेष रस नसल्याचे दिसून येत आहे. कारण राज्यातील १८ ते १९ वयोगटांतील केवळ २८ टक्के तरुणांनीच आतापर्यंत मतदानासाठी नावनोंदणी केली आहे.२०११च्या जणगणनेनुसार २०१९ला राज्यात १८ ते १९ वयोगटांतील तरुणांची संख्या ४३ लाख इतकी अपेक्षित आहे. याउलट ३१ जानेवारी, २०१९ पर्यंत या वयोगटांतील केवळ १२ लाख मतदारांनीच नोंदणी केल्याची माहिती आहे. जणगणनेनुसार अपेक्षित लोकसंख्या आणि नोंदणी केलेल्या तरुण मतदारांच्या संख्येत मोठी तफावत आहे. सुमारे ३१ लाख तरुण मतदारांनी मतदानासाठी नोंदणी केलेली नाही.तरुणांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी नावनोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने महाविद्यालयात पथनाट्य घेण्यापासून, सोशल जाहिरात, पोस्टर, बॅनर आणि सोशल मीडियावर विविध मार्गाने आवाहन केले आहे. याशिवाय, २३ व २४ फेब्रुवारीला, तसेच २ व ३ मार्चला सुट्टीच्या दिवशीही मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष शिबिर आयोजित केले होते.मात्र, त्यानंतरही तरुण मतदारांकडून म्हणावा तितका प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही. परिणामी, निवडणुकीच्या तोंडावर आणखी उपक्रम घेणे शक्य नसल्याचे वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यानेसांगितले.>अजूनही वेळ गेलेली नाहीनिवडणूक आयोगाने २ व ३ मार्चला विशेष शिबिरांद्वारे राज्यभरात नोंदणी मोहीम हाती घेतली होती. मुंबई शहरातून या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ५ हजार १०० मतदारांनी नाव नोंदणीसह नावात बदल, पत्ता बदल करण्यासाठी अर्ज केले. मुंबई उपनगरातील सुमारे १६ हजार मतदारांनी नाव नोंदणीसह पत्ता, नावात बदल करण्यासाठी अर्ज दाखल केले आहे.मात्र, तरुणांनी विशेष प्रतिसाद न दिल्याचे चित्र पाहायला मिळाले, तरी अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मतदार नोंदणी कार्यालयात निवडणुकीची घोषणा होईपर्यंत नवमतदार नोंदणी अर्ज भरून येत्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
मतदानाचा हक्क बजाविण्यात तरुणाई अनुत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 11:19 PM