लालबागच्या राजाचं दर्शन फक्त 10 मिनिटांत; गणेशभक्तांची गर्दी ओसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 01:28 PM2019-09-04T13:28:11+5:302019-09-04T14:03:24+5:30
पावसामुळे गणेश भक्तांची गर्दी कमी झाली आहे.
मुंबई - गेल्या 24 तासांपासून शहर आणि उपनगरात पडणाऱ्या पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच पावसामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ठाणे-मुंबई दरम्यान ठप्प झाली आहे.
माटुंगा-सायन दरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या सर्व मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच पावसामुळे लालबाग परिसरातही गणेश भक्तांची गर्दी ओसरली असून एरव्ही 12-14 तास रांगेत उभं राहून मिळणाऱ्या लालबागच्या राजाचं दर्शन सध्या 10 ते 15 मिनिटात उपलब्ध होत आहे. पावसामुळे गणेश भक्तांची गर्दी कमी झाली आहे.
लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा हे 86 वं वर्ष आहे. लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी येणारे भाविक मुंबईसह महाराष्ट्राबाहेरील असतात. या वर्षी राजाच्या सभोवताली चांद्रयान दोनचा देखावा साकरण्यात आला आहे.
अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाच्या फटका हा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला देखील बसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची मध्य रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच विक्रोळी-कांजुरमार्गदरम्यान पाणी साचल्याने धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
ठाणे ते कसारा, कर्जत वाहतूक सुरू आहे. मध्य रेल्वेपाठोपाठपश्चिम रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावरील वाशी त सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नालासोपारा स्टेशनवर रुळावर पाणी साचलं आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. वसई-विरार दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.