रेल्वेने योग्य खबरदारी घ्यायला हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:55 AM2018-06-14T04:55:46+5:302018-06-14T04:55:46+5:30
राज्यात मान्सून दाखल झाला आहे; पण पावसाळ्यात रेल्वेचा वेग मंदावल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. तर घाट परिसरात आणि कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. या पार्श्वभूमीवर विनाअडथळा प्रवास व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्ट्या’च्या व्यासपीठावर व्यक्त केले.
राज्यात मान्सून दाखल झाला आहे; पण पावसाळ्यात रेल्वेचा वेग मंदावल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. तर घाट परिसरात आणि कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. या पार्श्वभूमीवर विनाअडथळा प्रवास व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्ट्या’च्या व्यासपीठावर व्यक्त केले. यातील वाचकांच्या काही निवडक प्रतिक्रिया आणि रेल्वे प्रशासनाच्या तयारीचा आढावा.
दुरांतो एक्स्प्रेसची
पुनरावृत्ती नको
माती ट्रॅकवर आल्यामुळे आॅगस्ट महिन्यात नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचा अपघात झाला होता. यात सुदैवाने प्रवाशांचा मृत्यू झाला नाही. या प्रकरणी रेल्वे अधिकाºयांचे निलंबन देखील करण्यात आले होते, असे प्रकार टाळण्यासाठी मध्य रेल्वेने आधुनिक तंत्रज्ञानासह योग्य त्या उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. पावसाळ्यात कोकण मार्गावर पर्यटकांची विशेष गर्दी होते. कोकणातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी कोकण रेल्वेला देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. या वेळी प्रशासनाने पर्यटकांनुरूप बदल करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात विशेष: माती ट्रॅकवर येण्यापासून रोखणे आवश्यक आहे.
- राजेंद्र चव्हाण, लोअर परळ
स्थानकातील प्रवासी सुविधांपासून वंचित
सूचना आणि खबरदारी फलक उभारण्यापेक्षा रेल्वे प्रशासनाने योग्य उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. घाटांवरील कड्यांवर संरक्षक भिंती, पाणी रोखणारे उपाय आणि नियंत्रण यंत्रणा सुस्थितीत असणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने यंदाही घाट परिसरात पावसामुळे रेल्वे खोळंबणार नाही, असा दावा केला आहे. हा दावा
कितपत खरा ठरेल. हे लवकरच दिसून येईल. तत्पूर्वी पावसाळा आला तरी अद्याप स्थानकातील प्रवासी सुविधांपासून वंचित आहेत. पावसातदेखील विविध स्थानकांतील छतांची कामे अर्धवट आहेत. यामुळे ही कामे पूर्ण होणार तरी कधी? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
- प्रमोद पावसकर, विरार
पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. त्यानुसार, वीर ते कणकवली ७५ कि.मी. आणि कणकवली ते मडुरा ९० कि.मी प्रतितास या वेगाने रेल्वे धावणार आहेत. या मार्गावर ३५० ठिकाणी डोंगर कापून रेल्वेलाइन टाकण्यात आली आहे. यातील ३२० ठिकाणच्या ड्रेनेज स्वच्छतेचे काम प्रगतिपथावर आहे. येथे पाणी तुंबणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. वादळी वाºयामुळे रेल्वेमार्गावर झाडे कोसळू नयेत म्हणून या मार्गावरील धोकादायक झाडांची छाटणी करण्यात आली आहे.
रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यास तप्तरतेने हटवण्यासाठी तीन पोकलेन मशिन्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. फ्लॅट वॅगनवर यी मशिन्स ठेवण्यात आल्या असून, दरड कोसळल्यास त्या घटनास्थळी रवाना होऊ शकतील. रात्रीच्या वेळी गस्त घालण्यास ८५ पेट्रोलमनची नेमणूक करण्यात आली आहे. ६५ ट्रॅकमन दिवसभर कार्यरत राहणार आहेत. या मार्गावरील आगवे आणि बोरडवे या ठिकाणी उंच डोंगरामुळे दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अलार्म सिस्टीम लावण्यात आली आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील काळ, सावित्री आणि वसिष्ठी नदीवर पूर सतर्क यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे पूरसदृश परिस्थिती उद्भवल्यास स्टेशन मास्तर, इंजिनीअर आणि कंट्रोल रूमला धोक्याचा इशारा देण्यात येतो, तसेच या नदीत पाण्याखाली असणाºया पुलाच्या भागाची स्कूबा डायव्हर्सकडून पाहणी करण्यात आली असून, त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले आहे, असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.
यंदा त्रास झाल्यास
रेल्वे जबाबदार
यंदाच्या पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. ऐन पावसाळ्यात रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना त्रास झाल्यास त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असेल. याआधीही प्रवाशांना अशा प्रकारचा त्रास भोगावा लागला होता. त्यामुळे या वेळेस रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन काम करायला हवे. रेल्वे प्रशासनाने घाटमाथ्यावरील पावसाचा अंदाज घेऊन त्या पद्धतीच्या उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.
- उदय वाघवणकर, जोगेश्वरी (पूर्व)
आपत्कालीन
व्यवस्था गरजेची
कोकण रेल्वे ही डोंगर आणि दºयाखोºयातून जाते. पावसाळ्यात जेव्हा अतिवृष्टी होते. त्या वेळी पाणी तुंबणे, दरडी कोसळणे आणि माती रुळावर येणे, हे प्रकार सर्रास घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी काही ठिकाणी रेल्वे रुळांना समांतर भिंत उभारण्यासारखे प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे, तसेच पाण्याचा उपसा करणारे प्रभावशाली पंपाचे केंद्र असावे. घाटमाथ्यावरील पाणी वेगाने खाली येते त्यासाठी मातीचे बंधारे करणे आवश्यक आहे. तसेच खंदक खणून पाणी जिरवल्यास त्याचा निश्चित फायदा होईल. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन दक्षता पथके तयार करावीत. त्याचबरोबर सिग्नलची दुरुस्ती, रुळांची डागडुजी आणि स्लीपर बदलणे या सारख्या कामांना प्राधान्य दिल्यास पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास विनाअडथळा होणे शक्य आहे.
- महादेव जाधव, मुंबई सेंट्रल (पूर्व)
मध्य रेल्वेही सज्ज
1पावसाच्या पाण्यामुळे रेल्वेमार्ग वाहून जाण्याच्या दुर्घटना, तसेच रेल्वेस्थानकांच्या परिसरातील साचलेल्या पाण्यामुळे विस्कळीत किंवा खंडित होणाºया रेल्वेसेवेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष उपाययोजना केल्या आहेत. पावसाळ्यात अनेक ठिकाणी रेल्वेमार्गावर पाणी साठल्याने वाहतूक विस्कळीत होते, ही बाब लक्षात घेऊन पुणे विभागाकडून खंडाळा घाट परिसरातील रेल्वेमार्गाच्या आसापासची नालेसफाई पूर्ण करण्यात आली आहे. तसेच रेल्वेमार्गाच्या आजूबाजूला वाढलेल्या झाडांच्या फांद्यादेखील कापण्यात आल्या आहेत. याशिवाय ज्या ठिकाणी ट्रॅकच्या आसपास पावसाचे पाणी साठते, त्या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
2 मध्य रेल्वेच्या कसारा आणि खंडाळा घाटातील मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळ्या टाकण्यात आल्या आहेत. पाणी साठू नये यासाठी खडी, रेती आणि दगडांचा वापर करून रेल्वेमार्ग मजबूत करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावर पावसाळ्यात २४ तास विशेष गस्तीपथकाद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.
3हवामान विभागातर्फे मध्य रेल्वेच्या जागेवर हवामान विभागाचे विशेष उपकरण बसविण्यात येणार आहे. याबाबत हवामान विभागाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी पत्रव्यवहार केला आहे. लवकरच मध्य रेल्वेच्या वतीने उपलब्ध जागेची यादी हवामान विभागाला सादर करून हवामान विभागाची अत्याधुनिक उपकरणे त्वरित कार्यान्वित करण्यात येतील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
संकलन : महेश चेमटे