नुसताच ‘धुरळा’; धूळ, मातीने कोंडला श्वास; कुर्ल्यात खोदकामांनी अडविली वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:24 AM2020-01-13T01:24:51+5:302020-01-13T01:25:32+5:30
वाहनचालकांसह पादचारी मेटाकुटीला, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका
मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील मायकल हायस्कूल, होली क्रॉस हायस्कूल लगतच्या लाल बहादूर शास्त्री मार्गासह काळे मार्गावर रस्त्यांच्या कामांसाठी खोदाकाम हाती घेण्यात आले असून, या कामादरम्यान धूळ उडू नये, म्हणून मुंबई महापालिकेने काहीच खबरदारी घेतलेली नाही. परिणामी, येथे सुरू असलेल्या खोदकामामुळे एलबीएसवर मोठ्या प्रमाणावर धूळ, माती आणि वाहनांचा धूर; असे संयुक्तिक मिश्रण वातावरणात मिसळत असून, येथील दृश्यमानता कमी होत असल्याचे चित्र आहे. विशेषत: दुपारच्या उन्हात एलबीएसवर उडत असलेल्या धुरळ्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह लगतच्या नागरिकांना आणि पादचारी वर्गाला मोठा त्रास होत आहे.
येथील कामादरम्यान हवेत धूळ मिसळू नये अथवा उडू नयेत, म्हणून काहीच खबरदारी घेण्यात आलेली नाही. काम सुरू असलेल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी वेड्यावाकड्या स्वरूपात लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले असून, यातील निम्मे बॅरिकेट्स तर खाली पडले आहेत. फिनिक्स मॉलसमोरील रस्त्याचे काम किंचित स्वरूपात राहिल्याचे निदर्शनास येत असूनही येथील बॅरिकेट्स काढण्यात आलेले नाहीत. या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे आणि त्यात बॅरिकेट्स लगतही वाहने, विशेषत: रिक्षा उभ्या राहत असल्याने एलबीएस आणखी अरुंद होत आहे. एका वेळी केवळ एक वाहनही व्यवस्थित जाणार नाही, अशी अवस्था येथे झाली असून, काम सुरू असलेल्या ठिकाणांहूनच पादचारी वर्गास रस्ता शोधावा लागतो आहे, अशी माहिती कुर्ला येथील रहिवासी राकेश पाटील यांनी दिली.
विशेषत: आता काळे मार्गावरही इंडस्ट्रियल इस्टेटच्या परिसरात खोदकाम हाती घेण्यात आले असून, येथे बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. मुळात काळे मार्गावरील कमानी ते बैलबाजार ही एकदिशा वाहतूक केव्हाच पूर्णत: बंद करण्यात आली आहे. मात्र, तरीही नो एन्ट्री असलेल्या या एक दिशा मार्गाहून दुचाकी आणि रिक्षा उलट्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती अधिक आहे. हा बंद करण्यात आलेला एक दिशा मार्ग पुन्हा सुरू करण्याबाबत प्रशासन काहीच बोलत नाही आणि दुसरीकडे खोदकामादरम्यान ‘धुरळा’ उठवित पादचारी वर्गाचा रस्ता अडवित असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाने काळजी घ्यावी
एलबीएस, काळे मार्ग येथील खोदकामादरम्यान धूळ उडणार नाही, बॅरिकेट्स पडणार नाहीत आणि वेडेवाकडे लागणार नाहीत, पादचारी वर्गास चालण्यास पुरेशी जागा शिल्लक राहील, वाहने अनधिकृतरीत्या उभी राहणार नाहीत; याची पुरेशी काळजी जरी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी घेतली, तरी निम्मा प्रश्न सुटेल. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रश्न असाच पडून असून, आता तरी काही महिन्यांनी येथे सुरू करण्यात आलेले कामदेखील पूर्ण होईल, पण समस्या काही सुटणार नाहीत, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.