सुरेश ठमके -
मुंबई : दादरमधील प्रसिद्ध कबुतरखान्याच्या परिसरात कबुतरांच्या उच्छादामुळे दुकानदार, ग्राहक यांच्यासह स्थानिक नागरिकही अक्षरश: बेजार झाले आहेत. येथील कबुतरे दररोज अंदाजे अर्धा टन धान्य फस्त करत असून, स्थानिकांचे आरोग्य आणि स्वच्छतेलाही धोका निर्माण करत असल्याचा प्रकार आता समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने यासंदर्भात लवकरच योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दादर पश्चिमेकडील परिसरात हजारो कबुतरे उडताना दिसतात. येथील ब्रिटिशकालीन कबुतरखान्यामुळे या पक्ष्यांची संख्या येथे वेगाने वाढली आहे. याठिकाणी हजारो कबुतरे रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या उघड्या संरक्षित जागेवर बसलेली दिसतात, मात्र त्यापेक्षाही जास्त कबुतरे आजूबाजूच्या इमारतींवर विसावलेली असतात. अनेक इमारतींवर लाल कौले नाही, तर काळीभोर कबुतरेच दिसतात. त्यामुळे कबुतरांची संख्या किती असावी, याचा अंदाज येतो. कबुतरांची विष्ठा आणि पंखाची फडफड केल्याने निर्माण होणारी धूळ यामुळे स्थानिक नागरिक बेजार झाले आहेत.
कबुतरांमुळे घराच्या खिडकीत किंवा गॅलरीत काहीही ठेवू शकत नाही, कपडे सुकत घालायच्या दोऱ्यांवर कपड्यांपेक्षा कबुतरेच अधिक असतात. आम्ही पालिका प्रशासनाकडे या समस्येबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे. खिडक्यांमध्ये दिवस-रात्र कबुतरांचा आवाज सुरू असतो. या परिसरातील इमारतींच्या गॅलरीत, खिडकीत कबुतरांच्या विष्ठेशिवाय काही दिसतच नाही. पालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही, तर दुसरीकडे पक्षीप्रेमी संघटना याविरोधात कारवाई रोखण्यासाठी प्रयत्न करत असतात.- अनिल सौदडे, स्थानिक रहिवासी
आमचा हा कबुतरखाना अनेक वर्षांपासून इथे आहे, याचा कोणालाही त्रास होत असल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही. हजारो कबुतरे दररोज येथे दाणे खाण्यासाठी येतात. त्यांना आम्ही चणे, हरभरे, ज्वारी, बाजरी असे धान्य देतो. कबुतरखाना ट्रस्टच्या वतीने दररोज ५०० किलो धान्य कबुतरांना दिले जाते. याशिवाय नागरिक स्वतः आमच्याकडून विकत घेऊन कबुतरांना टाकत असतात. कबुतरांची देखभाल करण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी येथे सकाळी डॉक्टरही येतात.- जितूभाई, कबूतरखाना ट्रस्ट
कबूतरखान्यासमोर मी गेल्या कित्येक वर्षांपासून तयार कपडे विकण्याचा व्यवसाय करते. मात्र, कबुतरांमुळे माझे खूप नुकसान होते, कबुतरांच्या विष्ठेमुळे अनेक नवे कपडे खराब झाले आहेत. याशिवाय त्यांच्या आवाजामुळे गिऱ्हाईक काय बोलतात तेही ऐकू येत नाही.- जमना राठोड, दुकानदार.