Join us

फक्त उभे राहा अन् थेट मोनो टर्मिनलपर्यंत पोहोचा; महालक्ष्मी रेल्वेस्थानक 'ट्रॅव्हलेटर'ने जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 2:56 PM

महालक्ष्मी, संत गाडगे महाराज चौक मोनोरेल टर्मिनलशी जोडणार

मुंबई: प्रवाशांना मेट्रो, मोनोसारख्या प्रवासी सुविधा पुरवणाऱ्या एमएमआरडीएने प्रवाशांच्या सोईसाठी ट्रॅव्हलेटर म्हणजेच सरकता मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रॅव्हलेटरद्वारे महालक्ष्मी रेल्वेस्थानक, संत गाडगे महाराज चौक, मोनोरेल टर्मिनल जोडले जाणार आहे. या ट्रॅव्हलेटरवर उभे राहून प्रवास करावा लागणार आहे. तसेच जानेवारी २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे.

चेंबूर ते संत गाडगे महाराज मोनोरेल प्रकल्पातील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक, मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील महालक्ष्मी स्थानक तसेच महालक्ष्मी रेल्वेस्थानकाशी पादचारी पुलासह 'ट्रॅव्हलेटर' अर्थात सरकत्या मार्गाने जोडण्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. सल्लागारासह बांधकाम कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी या निविदा मागविण्यात आल्या आहेत.

प्रवास करणे सोपे-

संत गाडगे महाराज चौक ते मोनोरेल स्थानक आणि मेट्रो स्थानक यातील अंतर ७०० मीटर आहे हे अंतर चालणे त्रासदायक ठरणार असल्याने या ट्रॅव्हलेटरवर उभे राहून प्रवास करणे सोपे जाणार आहे. 

६३ कोटींचा खर्च-

एमएमआरडीएने मोनो रेल, मेट्रो आणि रेल्वे जोडण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार मोनोरेल स्थानके चार रेल्वेस्थानकांसह एका मेट्रो स्थानकाशी जोडण्यात येणार आहे. या कामासाठी आलेल्या निविदेनुसार ६३ कोटी ६८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

७ मीटर रुंदीचा ट्रॅव्हलेटर-

३२५ मीटर लांबीचा पादचारी पूल उभा करून त्यावर २६५ मीटर लांबीचा आणि ७ मीटर रुंदीचा ट्रॅव्हलेटर अर्थात सरकता मार्ग बांधण्यात येणार आहे. आठ ट्रॅव्हलेटर बांधण्याचे उद्दिष्ट आहे.

टॅग्स :मोनो रेल्वेमुंबई