बस दुरुस्तीसाठी तीन कोटी, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची वागळे आगाराला भेट
By admin | Published: July 4, 2014 09:45 PM2014-07-04T21:45:07+5:302014-07-06T23:27:19+5:30
बसेस दुरुस्तीसाठी पैसे मिळावेत, यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्यासमवेत वागळे आगाराची भेट घेतली
ठाणे।
बसेस दुरुस्तीसाठी पैसे मिळावेत, यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्यासमवेत वागळे आगाराची भेट घेतली. या वेळी आगारात शेकडो बसेस बंद अवस्थेत दिसून आल्या. त्यानुसार, आता आयुक्तांनी किरकोळ दुरुस्तीच्या बसेससाठी तत्काळ तीन कोटी देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार, या बसेस आता पुढील महिनाभरात रस्त्यावर धावतील, असे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी वागळे आगाराचा पाहणी दौरा केला. या दौर्यात येथील कामगारांनीसुद्धा आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. परंतु, गेल्या कित्येक महिन्यांपासून किरकोळ आणि मोठ्या दुरुस्तीसाठी शेकडो बसेस वागळे आगारात धूळ खात पडून आहेत. या बसेसच्या दुरुस्तीसाठी टीएमटी बचाव कृती समितीने सॅटीसवर प्रवाशांकडून निधी गोळा करून तो आयुक्तांना देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो निधी घेण्यास आयुक्तांनी नकार दिला. त्यानंतर, शुक्रवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या आगाराची पाहणी केली. या वेळी आयुक्तांनी किरकोळ दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या ५० बसेससाठी तीन कोटी देण्याचे मान्य केले. त्यानुसार, महिनाभरात या बसेस दुरुस्त करून त्या प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिले.