जेमतेम तीन आठवड्यांचाच पाणीसाठा
By admin | Published: June 14, 2016 12:55 AM2016-06-14T00:55:08+5:302016-06-14T00:55:08+5:30
जिल्ह्यात मागील वर्षी १३ जूनपर्यंत सुमारे १४ टक्के पडलेला पाऊस झाला होता. मात्र, या वर्षी तो दीड टक्का पडल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून उघड झाले आहे. १७ तारखेला पाऊस
ठाणे: जिल्ह्यात मागील वर्षी १३ जूनपर्यंत सुमारे १४ टक्के पडलेला पाऊस झाला होता. मात्र, या वर्षी तो दीड टक्का पडल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून उघड झाले आहे. १७ तारखेला पाऊस महाराष्टरात दाखल होईल, असा नवा अंदाज आहे. त्यानंतर तो धो धो पडला तरच आठवडाभरानंतर पाणीटंचाईतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ तीन आठवड्यांचा पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितल्याने पाणीप्रश्न अधिक बिकट झाल्याचे चित्र आहे.
पावसाला प्रारंभ होणारे मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. अजूनही पावसाची चाहूलही लागत नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याच्या भीतीने शहरातील रहिवाशांत भीती पसरली आहे. उन्हाची तीव्रता सोमवारी काहीअंशी कमी झालेली अनुभवायला मिळाली. दिवसभर कोवळे ऊन असले तरी पावसाची शक्यता नसल्याचे वातावरण दिवसभर होते. पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणासह उल्हास नदीच्या खोऱ्यात जोरदार पाऊस होणे अपेक्षित असतानाही तो झालेला नाही. यामुळे आंध्रा आणि बारवी धरणांत तीन आठवड्यांपुरताच पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीचे पात्र सध्या कोरडे पडत आहे. या नदीला आंध्रा धरणातून सध्या होत असलेला ७०० ते ८०० एमएलडी पाणीपुरवठा आता कोणत्याही क्षणी कमी होण्याची दाट शक्यता आहे. बारवी धरणात केवळ डबक्याडबक्यांनी पाणी पसरले आहे. चर खोदून मेन गेटपर्यंत या डबक्यातील पाणी आणण्याचा प्रसंग ओढवलेला आहे. मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षा जादा पाणी उचलल्यामुळे १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठ्याचा दावा फोल ठरला आहे. त्यादृष्टीने नियोजन करून आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा करूनही तलावांमध्ये पाणी शिल्लक नाही. (प्रतिनिधी)
ठाण्यात आज पाणी नाही
स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहरास होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहील. तर, एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सायं. ६ ते शनिवारी स. ६ पर्यंत बंद राहणार असून पुरवठा सुरू झाल्यानंतर पाणी कमी दाबाने येईल.