लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाहकाचा केवळ स्पर्श झाल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने अहवालात म्हटले आहे. शुक्रवारी हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला.
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने न्या. एस. जे. काथावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे एक टिपण सादर केले. मिशन ‘वंदे मातरम’ अंतर्गत परदेशातून विमानाने नागरिकांना परत आणताना त्यांच्या आरोग्याशी तडजोड केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मधली सीट रिक्त ठेवली जात नाही, अशी याचिका एअर इंडियाचे पायलट देवेन कनानी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्यायालयाने कोरोनाचा वाहक असलेल्या व्यक्तीचा केवळ स्पर्श झाला म्हणून दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? अशी शंका विचारत याचे निरसन करण्याचे निर्देश नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान प्रवाशांच्या आरोग्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीला दिले. शुक्रवारी या समितीने टिपण सादर केले. त्यानुसार, संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या स्पर्शाने अन्य व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.दरम्यान, न्यायालयाने डीजीसीएला अंतरिम दिलास देत मधली सीट आरक्षित झाली असल्यास ती सुरक्षेच्या उपयांचे काटेकोर पालन करत ती प्रवाशांना उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली.