न्यायमूर्ती बी. एच. लोया संशयास्पद मृत्यू प्रकरणी चौकशीला भाजपा विरोध का करत आहे ? हे खूपच अस्वाभाविक आहे – अभिषेक मनु संघवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 07:41 PM2018-01-17T19:41:56+5:302018-01-17T19:43:33+5:30
न्यायमूर्ती बी. एच. लोया यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे, या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी सुरुवातीपासून कॉंग्रेस पक्षाने केलेली आहे. आम्ही बोलत नाही आहोत की खून कोणी केला आहे, आम्ही फक्त या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करत आहोत, परंतु याला मात्र भाजपा विरोध का करत आहे, हे कळत नाही आहे.
मुंबई : न्यायमूर्ती बी. एच. लोया यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे, या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी सुरुवातीपासून कॉंग्रेस पक्षाने केलेली आहे. आम्ही बोलत नाही आहोत की खून कोणी केला आहे, आम्ही फक्त या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करत आहोत, परंतु याला मात्र भाजपा विरोध का करत आहे, हे कळत नाही आहे. हे खूपच अस्वाभाविक आहे, असे उद्गार खासदार आणि अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते अभिषेक मनु संघवी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत काढले. या पत्रकार परिषदेला मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी आमदार चरणसिंग सप्रा, सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर उपस्थित होते.
अभिषेक मनु संघवी पुढे म्हणाले की काही लोक म्हणत आहेत की हे प्रकरण कोर्टात आहे, कोर्ट प्रकरणात हस्तक्षेप करू नका, या मध्ये राजकारण आणू नका. पण यावर आमचे उत्तर असे आहे की आमची मागणी फक्त एवढीच आहे की न्यायमूर्ती सारख्या उच्च पातळीवर असलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू होतो हि गंभीर बाब आहे आणि याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. स्वतंत्र यंत्रणा किंवा समिती स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे आणि त्यांची हत्या कोणी केली हे सत्य बाहेर आलेच पाहिजे. आम्ही कोणावर ही आरोप करीत नाही आहोत परंतु खरा मारेकरी कोण हे जगासमोर आले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
ते पुढे म्हणाले की हा खूपच व्यापक आणि गंभीर विषय आहे आणि न्यायपालिकेवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण करणारा विषय आहे. बी. एच. लोया यांच्या परिवारावर ही खूप मोठा दबाव टाकला जात आहे. त्यामुळेच त्यांचा मुलगा, त्यांची बहिण आणि त्यांचे काका यांचे वेगवेगळे विधान समोर येत आहेत. त्यांची बहिण अनुराधा बियाणी या डॉक्टर असून त्यांनी बी एच लोया यांच्या पोस्ट मार्तंम रिपोर्टवर हि प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आरएसएसचा कार्यकर्ता ईश्वर बहेती यांच्याकडून सर्व गोष्टी मिळतात आणि कळतात हे खूपच संशायास्पद आणि आश्चर्यकारक आहे. त्यांचे शव नागपूरहून मुंबईला न येता परस्पर त्यांच्या गावी लातूरला नेण्यात आले हे देखील संशयास्पद आहे. न्यायमूर्ती सारख्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीसाठी कोणतेच सरकारी प्रोटोकोल पाळण्यात आलेले नव्हते. अशा अनेक गोष्टी आहेत त्याची उत्तरे मिळवीत यासाठी आम्ही या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करत आहोत. हे प्रकरण उच्च पातळीवर दडपण्याचा डाव आहे, असा आरोप अभिषेक मनु संघवी यांनी केला.