दीपालीला न्याय मिळण्यासाठी डॉक्टर एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 05:20 AM2018-04-06T05:20:02+5:302018-04-06T05:20:02+5:30
अपघाती मृत्यू झालेल्या नायर दंत महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी असणाऱ्या डॉ. दीपाली लहामाटे हिला न्याय मिळावा यासाठी गुरुवारी मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुंबई - अपघाती मृत्यू झालेल्या नायर दंत महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी असणाऱ्या डॉ. दीपाली लहामाटे हिला न्याय मिळावा यासाठी गुरुवारी मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. आपल्या मैत्रिणीला न्याय मिळावा यासाठी नायरसह अन्य रुग्णालयातील डॉक्टर आणि विद्यार्थी गुरुवारी सायंकाळी जे.जे. जिमखान्यात एकत्र जमले. यामध्ये जवळपास ३५० तज्ज्ञ डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
अपघातानंतर सहा दिवस मृत्यूशी सुरू असलेली डॉ. दीपालीची झुंज अपयशी ठरल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला होता. जे.जे. रुग्णालयात ३० मार्चला तिचा मृत्यू झाला. दीपालीला न्याय मिळावा आणि या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी यासाठी नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी एकत्र येऊन ‘जस्टिस फॉर दीपाली’ ही आॅनलाइन मोहीम सुुरू केली आहे, शिवाय आॅनलाइन याचिकाही दाखल केली आहे. याविषयी नायर दंत महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्रेड यांनी सांगितले की, दीपालीच्या कुटुंबीयांना बळ देण्यासाठी रुग्णालयात शोकसभा आयोजित केली होती. याप्रसंगी दीपालीचे आई-वडील आणि भाऊ उपस्थित होते. अपघातात जबाबदार असलेल्या दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशीच आम्हा सर्वांची इच्छा आहे. तर दीपालीच्या सहकारी असणाºया अनेक विद्यार्थ्यांनी या वेळी तिच्या आठवणींना उजाळा दिला. त्याशिवाय, दीपालीला न्याय मिळावा यासाठी अखेरपर्यंत झुंज देणार आहोत, असेही लोकमतशी बोलताना सांगितले.