वरळीत ‘जस्टिस फॉर गौरी’, आत्महत्याप्रकरणी स्थानिकांनी लावले बॅनर, न्यायाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 12:17 PM2023-01-29T12:17:27+5:302023-01-29T12:17:53+5:30
Justice for Gauri: चारित्र्यावर शिंतोडे उडविल्याच्या कथित आरोपावरून गौरी परदेशी या महिलेने नुकतीच आत्महत्या केली. या प्रकरणी स्थानिकांनी वरळी परिसरात बॅनर लावत गौरीला न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम उघडली आहे.
मुंबई : चारित्र्यावर शिंतोडे उडविल्याच्या कथित आरोपावरून गौरी परदेशी या महिलेने नुकतीच आत्महत्या केली. या प्रकरणी स्थानिकांनी वरळी परिसरात बॅनर लावत गौरीला न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम उघडली आहे.
गौरीचे पती योगेश परदेशी (३९) यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी माझ्या पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी वरळी परिसरात बॅनर लावले आहेत. तसेच स्थानिकांनी एक व्हॉट्सॲप ग्रुपही तयार केला असून ते पोलिस तपासावर लक्ष ठेवून आहेत. गौरी १६ जानेवारी रोजी गिरणीतून पीठ आणण्यासाठी गेली तेव्हा चक्की मालकाच्या मुलाने तिचा मोबाइल नंबर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला नकार देत याबाबत मला सांगितले. मी चक्की मालकाचा मुलगा अजिंक्य आव्हाड याला जाब विचारला तेव्हा पिठाच्या पिशवीचा क्रमांक विचारला, मोबाइल क्रमांक नाही असे उत्तर त्याने दिली. तर चक्कीचा मालक श्रावण यांनी तिला शिवीगाळ केली. तसेच पत्नीच्या चारित्र्यावर अयोग्य शेरेबाजी केली. त्या धक्क्यात गौरीने १८ जानेवारी रोजी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी आम्ही प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवत आहोत. अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल कोळी यांनी दिली.