मुंबई : न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका हेतुपुरस्सर असून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला बगल देण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप बॉम्बे लॉयर्स असोसिएशनचे अहमद आब्दी यांनी केला आहे.न्या. लोया यांचा मृत्यू नागपूरमध्ये अत्यंत संशयित पद्धतीने झाल्याने बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने ४ जानेवारी रोजी या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात सादर केली. मात्र १२ जानेवारीपर्यंत निबंधकांकडून या याचिकेच्या नोंदणीचा नंबर देण्यात आला नाही. साधारणत: कोणत्याही याचिकेला नंबर देण्यासाठी २ ते ४ दिवसांचा अवधी पुरेसा आहे. तरीही लोया यांच्या मृत्यूसंदर्भातील याचिकेला नंबर देण्यासाठी एवढा अवधी लावला. यासंबंधी पोलीस तक्रार करण्याची तयारी दर्शवल्यावर निबंधकांनी १५ मिनिटांत याचिकेला नंबर दिल्याचे आब्दी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.दरम्यान, मुंबईच्या एका पत्रकाराने सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली. शुक्रवारच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हणत राज्य सरकारला लोया यांचा शवविच्छेदनअहवालही सादर करण्याचे निर्देश देत या याचिकेवरील सुनावणी १५ जानेवारी रोजी ठेवली. आता या याचिकेत आब्दी मध्यस्थी अर्ज करणार आहेत.सुनावणीकडे सर्वांचे लक्ष- न्या. लोया हे मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातील न्यायालयात कार्यरत असल्याने व त्यांचा मृत्यू महाराष्ट्रात झाल्याने, या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयात व्हावी, अशी विनंती मी सर्वोच्च न्यायालयाला करणार आहे, असेही आब्दी यांनी सांगितले. त्यामुळे लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची विनंती करणाºया याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार की मुंबई उच्च न्यायालयात होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्या. लोया मृत्यू प्रकरण : हायकोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका हेतुपुरस्सर, बॉम्बे लॉयर्स असोसिएशनचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 3:43 AM