मुंबई : न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील यांची राष्ट्रपतींनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक केली. एक-दोन दिवसांत त्यांचा औपचारिक शपथविधी अपेक्षित आहे.मूळचे लातूरचे असलेले न्या. पाटील उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांमध्ये ज्येष्ठ आहेत. आधीच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. विजया ताहिलरामाणी मद्रासला मुख्य न्यायाधीश म्हणून गेल्यापासून न्या. पाटील गेले अडीच महिने प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहात आहेत.सर्वोच्च न्यायालायच्या ‘कॉलेजियम’ने १२ आॅक्टोबर रोजी न्या. पाटील यांच्या नावाची मुख्य न्यायाधीशपदासाठी शिफारस केली होती. मुख्य न्यायाधीश बाहेरच्या राज्यातून नेमण्याची प्रथा आहे. परंतु त्याला अपवाद करून न्या. पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. न्या. पाटील यांना निवृत्त व्हायला जेमतेम एक वर्ष शिल्लक आहे. शिवाय ९८ न्यायाधीशसंख्या असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाचा एकही न्यायाधीश देशभरात कुठेही हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश असणार नाही, या दोन बाबी लक्षात घेऊन हा अपवाद केला.लातुर येथील रहिवासी असलेले न्या. पाटील हे मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून आॅक्टोबर २००१ पासून ते उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. औरंगाबाद येथे काही वर्षे वकिली केल्यानंतर त्यांची औरंगाबाद खंडपीठात न्यायधीश म्हणून नेमणूक झाली होती. मुंबई उच्च न्यायालयास सुमारे २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘घरचा’च मुख्य न्यायाधीश मिळणार आहे. याआधी १९९४ मध्ये न्या. सुजाता मनोहर अशा प्रकारे मुख्य न्यायाधीश झाल्या होत्या.
न्या. नरेश पाटील होणार राज्याचे मुख्य न्यायाधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 4:54 AM