प्रतिज्ञापत्र सादर करण्यात दिरंगाई; ५ हजारांचा दंड मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी व होमगार्डचे महासमादेशक परमबीर सिंग यांना माजी न्या. चांदीवाल यांनी दणका दिला. चौकशी समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने त्यांना पाच हजार रुपयांचा दंड केला असून, तो मुख्यमंत्री साहाय्यता निधीत तातडीने सादर करण्यास सांगितले आहे.
परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत राज्य सरकारने चांदीवाल यांच्याकडे चौकशी सोपवली आहे. या आयोगाकडून सिंग यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोनदा समन्स बजाविण्यात आले होते. मात्र, सिंग यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आयोगाने त्यांना ५ हजारांचा दंड ठाेठावला. ही रक्कम तातडीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करावी, तसेच आरोपाच्या पुष्ट्यर्थ म्हणणे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना केली.
आयोगाने या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परमबीर सिंग, सचिन वाझेसह सर्व संबंधितांकडून प्रतिज्ञापत्र मागविले आहे. काहींनी त्यासाठी थोडा कालावधी वाढवून घेतला आहे. सिंग यांची मुंबईच्या आयुक्तपदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश वाझेला दिले होते, असा आरोप पत्राद्वारे केला होता.
* सचिन वाझेचा जबाब पूर्ण
या प्रकरणातील मुख्य साक्षीदार व बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने आपले म्हणणे सादर केले आहे. एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाझेला आयोगाने समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याने जबाब नोंदवला असल्याचे समजते.
.......................