लघुवाद न्यायालयात ५२ प्रकरणे निकाली
By admin | Published: April 10, 2017 06:26 AM2017-04-10T06:26:53+5:302017-04-10T06:26:53+5:30
राष्ट्रीय लोक अदालत कार्यक्रमाला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून
मुंबई : राष्ट्रीय लोक अदालत कार्यक्रमाला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण ५२ प्रकरणे निकाली लागली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे.
लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतच्या संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन अतिरिक्त मुख्य न्यायाधीश व्ही.एम. वैद्य, गणेश देशमुख, मुख्य निबंधक पी.बी. सुर्वे, अप्पर निबंधक, एन.डब्ल्यू. सावंत, एस.के. कावरे, एन.वाय. शाहिर यांनी केले होते. एकूण ३८० प्रकरणे सादर झाली होती. लघुवाद न्यायालयाच्या या पॅनेलमध्ये न्यायमूर्ती, वकील तसेच उत्तमराव यादव, अशोक शिंदे, प्रदीप कुशवार, अभिजित यादव, अशोक फलदेसाई हे समाजसेवक सहभागी झाले होते.
लोकन्यायालयात सहभागी होणारे समाजसेवक तसेच वकील हे प्रत्यक्ष समाजात वावरून तिथल्या विविध सामाजिक मानसिकतेची त्यांना पुरेपूर जाणीव असते. तसेच त्यातून सामंजस्य व तोडगा कसा निघू शकतो, याचे त्यांना विशेष भान असते. त्यामुळे त्या अनुभवाचा उपयोग त्यांना न्यायप्रक्रियेत निकालांची सोडवणूक करण्यासाठी झाला तसेच प्रत्येक पॅनेलच्या न्यायमूर्ती, वकील व समाजसेवकांनी कौशल्याचा पुरेपूर उपयोग केल्यामुळे दीर्घकाळ रेंगाळलेले अनेक प्रलंबित खटले निकाली लागले, असे मुख्य न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी याबाबत बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)