मुंबई : ‘लोकमत’ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि ‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतीनिमित्त ‘लोकमत’ संखी मंचतर्फे ‘भजन संध्या’चे आयोजन दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क मैदानासमोरील वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह येथे सोमवार, २३ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता करण्यात आले आहे.महाराष्ट्र आणि गोवा येथे सखी मंचच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरणाचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांना संगीतात विशेष रुची होती. त्यांनी आयुष्यभर स्वरसाधना केली. त्यांच्या संगीत साधनेला आदरांजली अर्पण करण्यासाठी गेल्या वर्षी त्यांच्या प्रथम स्मृतीनिमित्त ‘भजन संध्या’चे सादरीकरण करण्यात आले होते. आज ज्योत्स्ना दर्डा नाहीत, पण त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून सखी मंचचा प्रवास अविरत सुरू आहे. त्याचीच एक भाग म्हणून श्रद्धेय ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त ‘भजन संध्या’ होणार आहे. हिंदी-मराठी भजनांच्या स्वरूपात सुमधुर आवाजाने चिंतामणी सोहोनी आणि विद्या करलगीकर संचासह कार्यक्रमात भावपूर्ण श्रद्धांजली सादर करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सखी मंचतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ आज ‘भजन संध्या’
By admin | Published: March 23, 2015 2:13 AM