का रे दुरावा... देवेंद्र शपथविधीला गेले, पण उद्धव ठाकरेंना न भेटताच परतले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 08:45 PM2019-11-28T20:45:35+5:302019-11-28T20:46:09+5:30
माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मित्र देवेंद्र फडणवीस हेही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते
मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवलंच; पण राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुराही स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला आहे. ज्या शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवलं आणि वाढवलं, त्याच शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला देशभरातून दिग्गजांनी हजेरी लावली होती. तर, राज ठाकरेही कुटुंबासमवेत उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मित्र देवेंद्र फडणवीस हेही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मात्र, फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरेंनी भेट घेतलीच नाही. शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरेंना न भेटताच फडणवीस परतले. त्यानंतर, फेसबुक आणि ट्विटरवरुन फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे, का रे दुरावा... असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुळात, भाजपाला सोडून शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवीन घरोबा बसवला आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जाण्यामागे सर्वात मोठा रोल हा शिवसेनेचा राहिला. त्यामुळे फडणवीसांच्या मनात कुठंतरी थोडीशी निराशा असेल, म्हणूनच ते उद्धव ठाकरेंची भेट न घेताच परतले.
शिवेसना आणि भाजपाची युती टिकवून ठेवण्यात देवेंद फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची भूमिक राहिली आहे. या दोन्ही नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती जपण्यात रोल निभावला. गेल्या 5 वर्षांच्या काळातही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र यांची मैत्री महाराष्ट्राने पाहिली. तर, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याने आम्ही पाठिंबा दिला, दुसरं नाव असतं तर कदाचित आम्ही विचार केला असता, असंही उद्धव ठाकरें म्हटलं होतं. त्यामुळे या दोन-नेत्यांची मैत्री किती घट्ट होती, हे दिसून येते. मात्र, आजच्या शपथविधी सोहळ्यात भेट न घेतल्याने, या दोन मित्रांच्या दोस्तीत मुख्यमंत्रीपदावरुन कुस्ती झाल्याचं उघड झालंय.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरेजी यांनी मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. त्याप्रसंगी उपस्थित होतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2019
त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! @OfficeofUT@uddhavthackeray