Join us

कारागृहात मसाज, फेशियल सुविधा घेतल्‍याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीची चौकशी करणार- गृहराज्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 5:58 PM

मंजुळा शेट्ये यांच्‍या मृतदेहावर जखमा नव्‍हत्‍या असा पहिला खोटा अहवाल देणा-या जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टरची चौकशी करण्‍यात येईल.

मुंबई, दि. 28 - मंजुळा शेट्ये यांच्‍या मृतदेहावर जखमा नव्‍हत्‍या असा पहिला खोटा अहवाल देणा-या जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टरची चौकशी करण्‍यात येईल. तसेच इंद्राणी मुखर्जीला या कारागृहात मसाज, पेडिक्‍युअर, फेशियल अशा सुविधा मिळत होत्‍या, त्‍यामध्‍ये मंजुळा शेट्ये यांचा काही सहभाग होता का ? या प्रकरणीही चौकशी करण्‍यात येईल, अशी ग्‍वाही गृहराज्‍यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिली.मंजुळा शेट्ये मृत्‍यूप्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्‍यात आली होती. या चर्चेत सहभागी होताना मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मंजुळा शेट्ये यांच्‍या मृतदेहावर कोणत्याही जखमा नव्‍हत्‍या, असा खोटा अहवाल जे जे. रुग्‍णालयातील कॅज्‍युलिटी विभागाच्‍या डॉक्‍टरने दिला होता, त्‍याची चौकशी करून कारवाई करण्‍याची मागणी केली. ती गृहराज्‍यमंत्र्यांनी मान्‍य केली. याच चर्चेत पुढे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी एक धक्‍कादायक माहिती सभागृहासमोर आणली. 

ऑर्थर रोड कारागृहातील आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनीही या प्रकरणी न्‍यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून, या इंद्राणी मुखर्जी या कारागृहात मसाज, पेडिक्‍युअर, फेशियल अशा सुविधा घेत होत्‍या. त्‍यामध्‍ये मंजुळा शेट्ये त्‍यांना मदत करत होती. त्‍यामुळे ही बाबसुद्धा गंभीर असून त्‍यांचीही चौकशी करण्‍यात यावी अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. या प्रकरणीही तात्‍काळ चौकशी करण्‍याचे गृहराज्‍यमंत्र्यांनी मान्‍य केले. तसेच या प्रकरणी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणा-या वैद्यकीय अधिका-यावरही कारवाई करण्‍याचे गृहराज्‍यमंत्र्यांनी यावेळी मान्‍य केले.