‘बरेली’च्या आडून ‘काचधार’ची काटाकाटी सुरूच!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 09:40 AM2023-12-26T09:40:19+5:302023-12-26T09:41:19+5:30
उत्तर प्रदेशमधून विक्री केल्या जाणाऱ्या ‘बरेली’ मांजाच्या नावाखाली बंदी असलेला नायलॉनचा काचधार लावलेला मांजा मुंबईत लपूनछपून विक्री केला जात आहे.
मुंबई : उत्तर प्रदेशमधून विक्री केल्या जाणाऱ्या ‘बरेली’ मांजाच्या नावाखाली बंदी असलेला नायलॉनचा काचधार लावलेला मांजा मुंबईत लपूनछपून विक्री केला जात आहे. अलीकडेच या मांजाने गळा चिरल्याने एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. तरीसुद्धा पतंग मांजा विक्रेत्यांकडून नायलॉनचा काचधार मांजा विकला जात आहे.
मकरसंक्रांतीनिमित्त आकाशात इतरांचे पतंग कापता यावेत म्हणून उत्तम दर्जाचा मांजा विकत घेण्यासाठी पतंगप्रेमींची बाजारात गर्दी दिसते. यामध्ये उत्तर प्रदेशच्या बरेली मांजाला सर्वाधिक पसंती असते. त्यासाठी जास्तीचे पैसे देऊन काहीजण मांजा खरेदी करताना दिसतात. शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते.
ज्या ठिकाणी पोलिस कॉन्स्टेबलचा समीर जाधव यांचा मांजाने गळा चिरला, त्या वाकोला ब्रिज, कालिना झोपडपट्टी परिसरात काचेची धार असलेला मांजा तयार करण्याचे छुप्पे धंदे आहेत. येथून या परिसरात धारधार मांजा विकला जात आहे.
येथे विकला जातो मांजा -
वांद्रे (प) लक्की गल्ली
बेहरामपाडा
कुर्ला बैल बाजार
वडाळा मार्केट
धारावी ९० फूट रोड
मालाड मालवणी