देवीच्या घटासाठी कच्छी चुनरींना मागणी!

By admin | Published: October 9, 2015 03:29 AM2015-10-09T03:29:12+5:302015-10-09T03:29:12+5:30

नवरात्रौत्सवासाठी मुंबापुरीत खरेदीला उधाण आले असून विशेषत: यात महिलावर्ग आघाडीवर आहे. आदिमातेचा घट सजविण्यासाठी रेडीमेड वस्त्रे आणि साजेशा अलंकारांची

Kachhi Chunari demand for the dedication of Goddess! | देवीच्या घटासाठी कच्छी चुनरींना मागणी!

देवीच्या घटासाठी कच्छी चुनरींना मागणी!

Next

मुंबई : नवरात्रौत्सवासाठी मुंबापुरीत खरेदीला उधाण आले असून विशेषत: यात महिलावर्ग आघाडीवर आहे. आदिमातेचा घट सजविण्यासाठी रेडीमेड वस्त्रे आणि साजेशा अलंकारांची खरेदी करण्याकडे त्यांचा अधिक कल आहे. यातही घटाच्या वस्त्रांमध्ये कच्छी चुनरी महिलावर्गाच्या अधिकाधिक पसंतीस उतरत असल्याचे दिसून येते आहे.
भुलेश्वर, पायधुनी, मालाड, वांद्रे, दादर अशा बाजारपेठांमध्ये नवरात्रीच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येते. यात विक्रेत्यांकडील ‘रेडीमेड’ वस्तूंनाच जास्त मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. पूर्वी घटाच्या पूजेसाठी विविध रंगांच्या ब्लाऊजपीसचा वापर करीत असत. मात्र आता कालांतराने या घटाच्या पूजेसाठी विविध रंगी, निरनिराळ्या तऱ्हेची रेडीमेड वस्त्रे बाजारात आली आहेत.
गुजराती स्टाईल कच्छी वर्क केलेल्या, जाळीदार वस्त्रे आणि भरगच्च नक्षीकाम केलेल्या वस्त्रांना सर्वाधिक मागणी आहे. तसेच आकर्षक रंगसंगती आणि डिझायनर्स चुनरीही बाजारात उपलब्ध आहेत. हातरुमालाच्या आकारापासून उपलब्ध असणाऱ्या या चुनरी व वस्त्रांची किंमत अगदी ५० रुपयांपासून सुरू होते. तर घट अधिक सुंदर बनविण्यासाठी काही लेस बाजारात आहेत. त्यात घरात असणाऱ्या वस्त्रांना लावून घरच्या घरीही घटासाठी वस्त्रे तयार करता येतील. (प्रतिनिधी)

नवरात्रौत्सवातील रंग केवळ सांस्कृतिक!
गेल्या काही वर्षांत नवरात्रीच्या कालावधीत प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगांचे पोशाख परिधान करण्याचा ट्रेंड दिसून येतो आहे. मात्र नवरात्रौत्सवातील हे रंग केवळ सांस्कृतिक असून याचा धार्मिकतेशी संबंध नसल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे.
नवरात्रौत्सव काळात त्या त्या रंगांची वस्त्रे परिधान करण्यामागे एकात्मतेचा उद्देश दिसून येतो. एकाच रंगाची वस्त्रे परिधान करण्यामुळे सुरक्षित भावना निर्माण होते, एकोपा वाढतो, असे सोमण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ठरावीक दिवसाला विशिष्ट रंगांमुळे फलज्योतिष प्राप्त होईल, हा समजही चुकीचा असून यामागे अशी कोणतीच भावना नाही.
केवळ एकत्र येऊन एकाच रंगाच्या वस्त्रांमधून नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यात येतो. आठवड्याच्या प्रत्येक वाराचे रंग ग्रहाप्रमाणे ठरलेले असतात. मात्र त्या रंगांचे वस्त्र परिधान करणे अशाप्रकारे कोणतीच सूचना त्यामागे करण्यात आलेली नसल्याचे सोमण यांनी सांगितले.

नवरंग ..
१३ आॅक्टोबर - लाल
१४ आॅक्टोबर - निळा
१५ आॅक्टोबर - पिवळा
१६ आॅक्टोबर - हिरवा
१७ आॅक्टोबर - करडा
१८ आॅक्टोबर - केशरी
१९ आॅक्टोबर - पांढरा
२० आॅक्टोबर - गुलाबी
२१ आॅक्टोबर - जांभळा

Web Title: Kachhi Chunari demand for the dedication of Goddess!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.