इस्लामपूर (जि. सांगली) : कडकनाथ फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केलेल्या चारचाकी मोटारीवरील ‘रयत क्रांती संघटने’चा लोगो एका रात्रीत गायब झाला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात सीसीटीव्हीचा वॉच असतानाही, हा लोगो कोणी पुसला, तो कोणी काढून टाकला, असा सवाल उपस्थित होत आहे.
रयत अॅग्रो व महारयत अॅग्रो या कंपन्यांद्वारे झालेल्या कोट्यवधींच्या कडकनाथ कोंबडीपालन फसवणूकप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी संदीप मोहिते वापरत असलेली चारचाकी मोटार ताब्यात घेतली. ती येथील पोलीस ठाण्याच्या आवारात लावली आहे. ही मोटार जप्त केली, त्या वेळी तिच्या पाठीमागच्या बाजूच्या काचेवर रयत क्रांती संघटनेचा लोगो होता. मात्र दुसऱ्याच दिवशी लोगो गायब झाला. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता मोटारीवरील लोगो गायब झाल्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी, ‘तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे’, असे सांगितले.