कदम यांचा आज भाजप प्रवेश

By admin | Published: January 31, 2017 11:23 PM2017-01-31T23:23:45+5:302017-01-31T23:23:45+5:30

बाळ मानेंची माहिती; चिपळुणातील पाच नगरसेवकही प्रवेश करणार

Kadam's entry into BJP today | कदम यांचा आज भाजप प्रवेश

कदम यांचा आज भाजप प्रवेश

Next

रत्नागिरी : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम आज, बुधवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत चिपळूणमधील राष्ट्रवादीचे ५ नगरसेवक तसेच रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील त्यांचे कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिली.
जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी माने यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केली. भाजप उमेदवारांच्या यादीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस या पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेल्या अनेकांचा समावेश आहे. भाजपमध्ये येण्यास अन्य पक्षांतील अनेक मातब्बर नेते उत्सुक आहेत. येत्या आठवड्यात त्यांच्या भाजपमधील प्रवेशाची शक्यता माने यांनी व्यक्त केली.
चिपळूण नगर परिषद निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये जे राजकारण झाले त्याला कंटाळून रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँगे्रसला रामराम केला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही
जाहीर केले. मात्र, कदम यांचा भाजप प्रवेश लांबला होता. (प्रतिनिधी)

जनतेने नाकारले हे अर्धसत्य...
चिपळूण नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे पॅनेल उभे केल्यानंतर केवळ ५ नगरसेवक निवडून आले. हा रमेश कदम यांचा पराभवच होता. जनतेने नाकारलेल्या कदमांना भाजपने कसे काय स्वीकारले, असे विचारता माने म्हणाले, जनतेने नाकारले हे अर्धसत्य आहे.
चिपळुणच्या १३ प्रभागांतील मतदानाची आकडेवारी पाहता हजारो मतदार त्यांच्या पाठीशी असल्याचे पुढे आले आहे. मतांचे विभाजन झाल्याने त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. पराभव झाला म्हणून कोणी राजकारणातून संपला असे होत नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या अन्य पक्षांतील काही नेत्यांचाही रमेश कदम यांच्या भाजप प्रवेशाला विरोध होता.
त्यामुळे कदम यांचा भाजप प्रवेश लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आज, बुधवारी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याने अन्य शक्यतांवर पडदा पडणार आहे.

Web Title: Kadam's entry into BJP today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.