मुंबई : गणेशोत्सव सुरळीत पार पडला असला तरी रविवारच्या अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईसह राज्यात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व विसर्जन स्थळे, महत्त्वाची, गर्दीची ठिकाणे आणि रेल्वे स्थानक परिसरात विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांच्या पार्श्वभूमीवर अतिदक्षतेचा इशारा देत विशेष खबरदारी घेतली जात आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे. मुंबईसह प्रमुख शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मॉलच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त केंद्रीय सुरक्षा राखीव दलाची १ तर राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ तुकड्या मागविण्यात आल्या आहेत. त्याशिवाय ५०० होमगार्ड व अन्य घटकांतून २७५ पोलीस कर्मचारी मागविण्यात आले आहेत. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाइन गणपतीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले आहे.
मुंबईतील सर्व रेल्वे स्थानके व परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रवाशांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता संशयास्पद वस्तू, व्यक्तीबद्दल तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन लोहमार्ग आयुक्त कैसर खालिद यांनी केले आहे. दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक करून संभाव्य घातपाती कट उघड केला. त्यामुळे यंदा विशेष खबरदारी घेतली जात आहे.