- जमीर काझी मुंबई - वरळीतील पोलीस मुख्यालयातून (एलए-३) जिवंत काडतुसे चोरीप्रकरणी सुरक्षा प्रमुखासह (गार्ड इन्चार्ज) सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये काडतुसे चोरणा-या पोलिसाचाही समावेश असून सर्वांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. शनिवारी रात्री घडलेले हे प्रकरण अधिका-यांकडून दडपण्याचा प्रयत्न होत होता. मात्र ‘लोकमत’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्यानंतर पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मंगळवारी त्याबाबतचे आदेश बजाविले.हवालदार विजय हेर्लेकर , कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल संकेत माळी, महेश दुधवडे, राजीव पवार, राहुल कदम व महेंद्र पाटील अशी त्यांची नावे आहेत. हेर्लेकर हे ‘एलए’तील गार्ड इन्चार्ज आहेत तर कुर्ला पोलीस ठाण्यात नियुक्तीला असलेल्या पाटील याने वरळीतील सशस्त्र विभागातून काडतुसे व चार्जर क्लिप लंपास केल्या होत्या. आता या सर्वांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे.चार सशस्त्र विभागापैकी एक असलेल्या वरळी येथील मुख्यालयातील स्टोअर रुमजवळ रात्री अकराच्या सुमारास पाटील गेला. त्याठिकाणी रात्रीच्या ड्युटीला असलेले हवालदार हेर्लेकर यांच्यासह पाचही गार्ड झोपलेले होते. त्याने कॉन्स्टेबल माळी याने कमरेला बांधावयाचा ५० जिवंत काडतुसाचा पट्टा (राऊंड) काढून घेतला. त्याचबरोबर दोन रिकामे चार्ज क्लिप घेवून पसार झाला. थोड्यावेळानंतर कॉन्स्टेबल माळीला जाग आली असता त्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने तातडीने अन्य सहकाºयांना उठवून घडलेला प्रकार वरिष्ठांना कळविला. घटनेचे गांर्भिय समजून सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवन भारती, ‘एलए’च्या प्रमुख अस्वती दोरजे यांनी वरळी मुुख्यालयाला भेट देवून पाहणी केली. चोरीला गेलेल्या काडतुसाचा शोध सुरु असल्याचे समजल्यानंतर कॉन्स्टेबल पाटील याने ती रात्री दोनच्या सुमारास दादर पोलीस ठाण्यात नेवून जमा केली. चोरीला गेलेल्या वस्तू मिळाल्याने या प्रकाराची वाच्यता बदनामी होवू नये,यासाठी वरिष्ठ अधिका-यांकडून प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याबाबतचे वृत्त सोमवारी प्रकाशित केले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने या प्रकरणी संबंधित पोलिसांची प्राथमिक चौकशी सुरु केली. मात्र त्याबाबत अप्पर आयुक्त अस्वती दोरजे,वरळी मुख्यालयाच्या उपायुक्त सुनिता सांळुके- ठाकरे यांच्याकडून माहिती दडपण्याचा प्रयत्न होता. ‘लोकमत’ने त्याबाबतचेही वृत्त मंगळवारी दिल्यानंतर आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सर्व सबंधितांचा प्राथमिक चौकशी पूर्ण करुन अहवाल सादर करण्याची सूचना दिली. त्यानंतर सहाही जणांच्या निलंबित करुन त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले. ही घटना अत्यंत गंभीर असून त्याबाबत योग्य दक्षता बाळगण्याची सूचना अधिकाºयांना केली आहे. त्याचप्रमाणे यामध्ये दोषी आढळलेल्या सहाजणांना निलंबित केले असून विभागीय चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल. कॉन्स्टेबलने काडतुसे पळविण्यामागील नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतर आवश्यकतेनुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. अधिकाºयांना आवश्यक माहिती देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.- दत्ता पडसलगीकर ( पोलीस आयुक्त)
काडतूस चोरी प्रकरण : गार्ड इन्चार्जसह सहा पोलिसांचे पोलिसांचे अखेर निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 9:19 PM