‘नायर’मध्ये काविळीचा धोका!
By admin | Published: March 6, 2016 03:01 AM2016-03-06T03:01:14+5:302016-03-06T03:01:14+5:30
पाणी उकळून, गाळून प्या, अशुद्ध पाण्यामुळे कावीळ होण्याचा धोका वाढतो, असे डॉक्टर रुग्णांना आवर्जून सांगतात. पण दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती नायर रुग्णालयात निर्माण झाली आहे.
मुंबई : पाणी उकळून, गाळून प्या, अशुद्ध पाण्यामुळे कावीळ होण्याचा धोका वाढतो, असे डॉक्टर रुग्णांना आवर्जून सांगतात. पण दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती नायर रुग्णालयात निर्माण झाली आहे. गेल्या एका महिन्यात नायर रुग्णालयातील १५ निवासी डॉक्टरांना आणि ५ परिचारिकांना कावीळ झाली आहे. सध्या दोन निवासी डॉक्टर आणि १ परिचारिका अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती मार्डकडून देण्यात आली.
गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची समस्या नायर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे आणि मिळणारे पाणी अशुद्ध असल्यामुळे डॉक्टर, परिचारिकांची कोंडी होत आहे. अनेकदा परिचारिका, कर्मचारी पाणी पिणे टाळतात. त्याचबरोबर नायर रुग्णालयाच्या परिसरात खाणेही टाळतात. कारण, त्यामुळे पोटदुखी, उलट्या-जुलाब असे त्रास होतातच. पण त्याचबरोबर कावीळ होण्याचा धोका अधिक आहे. अशुद्ध पाण्यामुळे अनेकांना त्रास होत असून कावीळ झाली असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
कर्मचारी, परिचारिका रुग्णालयातील पाणी पिणे टाळू शकतात. मात्र, निवासी डॉक्टर, विद्यार्थी, विद्यार्थी परिचारिका हे सर्व जण रुग्णालयाच्या परिसरातच राहतात. त्यामुळे येथे येणारे पाणी पिण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. सर्जरी, मानसोपचार, मेडिसीन, डायबेटॉलॉजी, कार्डिओलॉजी या विभागातील निवासी डॉक्टरांना कावीळ झाली आहे. याआधीही अनेकांना त्रास झाला आहे. दोन डॉक्टर आणि एक परिचारिकांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. तर एका निवासी डॉक्टरची काविळीसाठी तपासणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयात स्वच्छ पाणी मिळत नाही, हे अत्यंत वाईट असल्याची भावना मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केली.
डॉ. मुंदडा यांनी पुढे सांगितले, एका निवासी डॉक्टरच्या वडिलांनी ई वॉर्डमध्ये तक्रार दाखल केली आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रश्नात लक्ष घातले पाहिजे. पाइपलाइन फुटल्यामुळे असे होऊ शकते. पण रुग्णालय प्रशासनाने अशुद्ध पाणी का येत आहे, याचा शोध घेतला पाहिजे. रुग्णांच्या आरोग्याचाही विचार व्हायला पाहिजे. लवकरच याविषयी रुग्णालय प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)