Join us  

आयआयटीतून काकोडकरांचा राजीनामा

By admin | Published: March 19, 2015 1:30 AM

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मंगळवारी आयआयटी मुंबईच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

मुंबई : देशातील आयआयटीमधील संचालक निवडीवरून मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आयआयटी प्रशासनामध्ये वाद सुरू आहे. तशातच ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मंगळवारी आयआयटी मुंबईच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काकोडकर यांनी हा निर्णय बदलावा, यासाठी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे.आयआयटीच्या निवड आणि स्थायी समितीचे सदस्य असणाऱ्या काकोडकरांनी पाटणा, भुवनेश्वर आणि रोपर या आयआयटीच्या संचालक निवडीच्या प्रक्रियेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. स्मृती इराणी या निवड समितीच्या अध्यक्षपदी आहेत. तीन आयआयटीच्या संचालकपदासाठी ३७ अंतिम उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यामधून १२ उमेदवारांना १६ फेब्रुवारी रोजी मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. यापैकी पाटणा आणि भुवनेश्वरच्या उमेदवाराच्या निवडीबद्दल समितीतील सदस्यांचे एकमत झाले होते. मात्र, रोपर आयआयटीच्या संचालकांच्या निवडीत एकमत होत नव्हते. दरम्यान, इराणी यांनी काकोडकर यांच्याशी मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. काहीजण माझ्या खात्यातील कामाविषयी गैरसमज पसरवत असल्याचेही इराणी यांचे म्हणणे आहे.