काळाचौकी, शिवडीत पाणीटंचाई, ऐन पावसाळ्यात वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 02:59 AM2018-08-16T02:59:10+5:302018-08-16T02:59:24+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलावं तुडुंब भरली, तरी दक्षिण मध्य मुंबईतील काळाचौकी, आंबेवाडी आणि शिवडीमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलावं तुडुंब भरली, तरी दक्षिण मध्य मुंबईतील काळाचौकी, आंबेवाडी आणि शिवडीमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे पंपिंग करणारी यंत्रणा आणि मोटर्सची क्षमता याचे आयुष्यमान संपुष्टात आल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे. मात्र ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने स्थानिक रहिवाशी हैराण झाले आहेत.
१९८९ पासून कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाजवळ बीपीटी बाऊंड्री रोड येथे ४.५ दशलक्ष क्षमतेचे फॉसबेरी सेवा जलाशय आणि उदंचन केंद्र कार्यान्वित आहे. या जलाशयातून आंबेवाडी, काळाचौकी येथे सकाळी ४ ते ७ आणि बीपीटी शिवडी विभागाला सायंकाळी ६ ते ८. ३० या वेळेत पंपिंग यंत्रणेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. या उदंचन केंद्रातून पाणी पुरवठा करण्यात येणारे विभाग हे दाट प्रमाणात विस्तारलेले आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना पाणी पुरवठा कमी दाबाने सुरू आहे. येथील यंत्रणा गेली २७ वर्षे वापरात असल्यामुळे तीनही संच, त्यांच्या मोटर्स आणि कंट्रोल पॅनल यांची उपयुक्त क्षमता आणि आयुर्मान संपुष्टात आले आहे. तसेच कंट्रोल पॅनेल जुन्या रचनेचे असल्याने सध्या बाजारात त्यांचे सुटे भाग उपलब्ध होत नाहीत आणि विद्युत मोटर्सदेखील वारंवार बिघडत असतात. या सर्व कारणांमुळे बऱ्याचदा या विभागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले संच बदलून त्या ठिकाणी ३०० लिटर प्रति सेकंद आणि ५० मीटर दाब क्षमतेची मोटर व अन्य यंत्रणा बसविण्यात येणार आहेत.
पालिका करणार तीन कोटी २८ लाखांचा खर्च
फॉसबेरी सेवा जलाशय आणि उदंचन केंद्र सध्या २७८ लिटर प्रति सेकंद व ४४ मीटर दाब क्षमतेचे तीन पम्पिंग संच १९८९ पासून कार्यान्वित आहेत. ते या विभागाला पाणीपुरवठा करतात.
शिवडी, काळाचौकीमध्ये पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेली पम्पिंग यंत्रणा बदलून उच्च क्षमतेची यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
यासाठी महापालिका तीन कोटी २८ लाख रुपये खर्च करणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर निर्णय होणार आहे.