- गौरी टेंबकर - कलगुटकर मुंबई : नवी मुंबईच्या कळंबोली परिसरात सोमवारी एलइडीसदृश्य बॉम्ब सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या अनुषंगाने मुंबईतील सर्वच शाळा आणि त्याच्या आसपासच्या परिसराची तपासणी करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यातील दहशतवादविरोधी कक्षाला (अँटी टेररीजम सेल - एटीसी) दिल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.कळंबोलीच्या सेक्टर एकमध्ये सुधागड एज्युकेशन शाळेच्या रस्त्यावर सोमवारी दुपारी हातगाडीवर ठेवलेला बॉम्ब नवी मुंबई बॉम्बशोधक आणि नाशक विभागाला (बीडीडीएस) सापडला. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या सर्व पोलीस ठाण्यातील एटीसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक शाळांची तपासणी करावी, असे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून देण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कळंबोलीत घडलेल्या या प्रकारानंतर शाळांमध्ये घातपात करत, विद्यार्थ्यांना लक्ष्य करत नुकसान करण्याचा इरादा समाजकंटकांचा असू शकतो, असा संशय आहे. त्यामुळे याबाबत कोणताही हलगर्जीपणा न करता, एटीसीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना हाती घेणे गरजेचे असल्याचेही त्यांना सांगण्यात आले आहे.श्वानपथकाच्या मदतीने तपासणीशाळा अथवा शाळेच्या आसपास कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास, त्याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याला कळविण्यात यावे, अशा सूचना शाळा प्रशासनाला देण्यात येणार आहेत. त्यासाठी स्थानिक शाळांचे विश्वस्त, तसेच मुख्याध्यापकांसोबत चर्चा केली जाणार असल्याचेही एटीसीच्या एका अधिकाºयाने सांगितले. शाळांसह मॉल, मल्टिप्लेक्स, बाजारपेठांमध्येही श्वानपथकाच्या मदतीने तपासणी केली जाणार आहे.‘त्या’ संशयिताच्या शोधासाठी पाच पथकेनवी मुंबई : शाळेबाहेर बॉम्बसदृश वस्तू ठेवून दहशत पसरवणाºयाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्याकरिता गुन्हे शाखा व परिमंडळ दोनमधील ७५ पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून सराईत गुन्हेगारांची माहिती मिळवून संशयिताचा शोध घेतला जात आहे. त्याकरिता हातगाडीवरून बॉम्बसदृश वस्तू घेऊन जाणाºया व्यक्तीच्या सीसीटीव्हीत कैद झालेल्या वर्णनाचाही आधार घेतला जात आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त होत आहे. तर या घटनेच्या अनुषंगाने नागरिकांनी शाळा, महाविद्यालये, मॉल्स, चित्रपटगृहे तसेच गर्दीच्या इतर ठिकाणी बेवारस वस्तू आढळल्यास त्याला स्पर्श न करता पोलिसांना कळवण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
कळंबोली बॉम्बप्रकरण: मुंबईतील स्थानिक शाळा, आसपासच्या विभागाची तपासणी करा-पोलीस आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 4:11 AM