Join us

कलानगर उड्डाणपुल : प्रकल्पाचे ७३ टक्के काम पूर्ण; १० मिनिटे वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 6:25 PM

Kalanagar flyover : उड्डाणपुलावर स्टील गर्डर; ३१  डिसेंबर २०२० पर्यंत हे काम पूर्ण अपेक्षित

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वांद्रे (पूर्व) येथे कलनगर जंक्शनवर हाती घेतलेले उड्डाणपूलाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. या उड्डाणपूलावर तीन मार्गिका असणार आहेत. शनिवारी मध्यरात्री कलानगर उड्डाणपुलावर स्टील गर्डर उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शनिवारी मध्यरात्री सुरु करण्यात आलेले हे काम रविवारी सकाळी पूर्ण करण्यात आले. कलानगर उड्डाणपुलावर हा  तिसरा गर्डर बसविण्यात आला आहे. हे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे, असा दावा प्राधिकरणाने केला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे काम सुरु असताना पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील कामाच्या जागेवर प्रत्यक्ष उपस्थित होते. हा मैलाचा दगड पार करण्यासाठी त्यांनी संपूर्ण टीमला प्रोत्साहित केले. यावेळी एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांच्यासह उर्वरित अधिकारी उपस्थित होते.  

कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग व वांद्रे-कुर्ला जोडरस्त्यासह इतर तीन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतूक कोंडी सुटून वाहतूक सुरळीत होण्यात मदत होणार आहे. यामुळे वाहतुकीच्या वेळात सुमारे १० मिनिटांची बचत होईल.  आतापर्यंत या प्रकल्पाचे ७३ टक्के काम पूर्ण झाले असून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत या प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. राजीव म्हणाले की, कलानगर जंक्शन उड्डाणपूल नियोजित वेळेत पूर्ण होऊन कार्यान्वित होणे ही गोष्ट अभिमानास्पद आहे. याने मुंबई महानगराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. 

------------------- १) मार्गिका - ब - वरळी - वांद्रे सागरी मार्गाकडून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी दोन पदरी मार्गिका. या मार्गिकेची लांबी - ७१४.४० मीटर असूनव रुंदी - ७.५० मीटर आहे. 

२) मार्गिका - क - वांद्रे-कुर्ला संकुलाकडून वांद्रे - वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी दोन पदरी मार्गिका. या मार्गिकेची लांबी - ६०४.१० मीटर आणि रुंदी - ७.५० मीटर असेल.

३) मार्गिका - ड - धरावी जंक्शनकडून वांद्रे - वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी असणार आहे. ही मार्गिकाही स्वतंत्र आणि दोन पदरी असून ही विना सिग्नल असणार आहे. या मार्गिकेची लांबी - ३१०.१० मीटर व रुंदी - ७.५० मीटर असेल.

-------------------

- प्रकल्पाची एकूण किंमत १०३.७३ कोटी- कामाचा आदेश २ जानेवारी २०१७ रोजी काढण्यात आला- मे. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हे याचे ठेकेदार आहेत.- उपठेकेदाराची नियुक्ती २९ जानेवारी २०२० रोजी करण्यात आली.- ३१  डिसेंबर २०२० पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :एमएमआरडीएरस्ते सुरक्षारस्ते वाहतूकमुंबई