मुंबई : गेल्या काही वर्षांत निसर्गाप्रती आणि प्राण्यांविषयी आपली करुणा हरवत चालली आहे, ही भावना पुन्हा जागरूक करण्याचा प्रयत्न ‘ग्राफिक एक्स्प्रेशन्स’ या कला प्रदर्शनातून करण्यात आला आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके यांचे ‘ग्राफिक एक्स्प्रेशन्स’ हे कलाप्रदर्शन कुलाबा येथील जहांगीर कला दालनात आयोजित केले आहे. हे प्रदर्शन कलारसिकांसाठी २ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते ७.३० या वेळेत खुले राहील.जहांगीर कला दालनात या प्रदर्शनाला बुधवारी ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांंनी भेट दिली. या प्रदर्शनाला कलाकृती न्याहाळताना त्यांनी रामटेके यांच्या कल्पनाविश्वाचे कौतुकही केले. मंगळवारी रामटेके यांच्या कला प्रदर्शनाचे उद्घाटन जे. जे. स्कूल आॅफ आर्टचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ साबळे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी, कला विश्वातील दिग्गज चित्रकार आणि शिल्पकारांनी या प्रदर्शनाला भेट दिली, तसेच या प्रदर्शनातील कलाकृतींचे कौतुकही केले.मूळचे नागपूरचे असणारे प्रमोद रामटेके हे गेली अनेक वर्ष कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. देशाच्या विविध कलादालनांमध्ये रामटेके यांनी साकारलेल्या कलाकृती आहेत. १९७६ पासून रामटेके हे राष्ट्रीय ललित कला अकादमीचे सक्रीय सदस्य आहेत. त्यांनी साकारलेल्या कलाकृती या ललित कला अकादमी, नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट (दिल्ली), भारत भवन (भोपाळ), स्टेट एलकेए (चेन्नई), बॉम्बे आर्ट सोसायटी, नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट (मुंबई) अशा विविध दालनांमध्ये आहेत, तसेच मुख्य म्हणजे राष्ट्रपतींचे राष्ट्रपती भवनात लावलेले पोर्ट्रेटही प्रमोदबाबू यांनी रेखाटलेले आहे. त्याचप्रमाणे, परदेशांतही विविध दालनांमध्ये त्यांच्या सृजनशील कलाकृती मांडण्यात आल्या आहेत.या प्रदर्शनाविषयी रामटेके यांनी सांगितले की, वर्षभर या संकल्पनेवर काम करत होतो. विचार, कल्पना यापासून सुरू झालेला प्रवास वर्षभरानंतर कॅनव्हासवर उतरला. या कलाकृतींचे माध्यम ‘सेरीग्राफ’ आहे. म्हणजेच, जागतिक पातळीवर स्क्रीन प्रिटिंग या पद्धतीचा वापर होतो, त्याच पद्धतीने या कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. सध्या समाजात ज्या करुणेचा अभाव आहे, त्याची जाणीव करून देण्यासाठी या कलाकृतींची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घ तपस्येचा अनुभव कलाकृतींमध्ये प्रतिबिंबित झाला आहे.
‘ग्राफिक एक्स्प्रेशन्स’ला कलारसिकांची दाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:02 AM