लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काळबादेवीतील एका व्यापाऱ्याचा २३ लाख रुपये किमतीचा कपड्यांचा माल घेऊन ठग पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला कॉम्ल्पेक्समध्ये ४१ वर्षीय तक्रारदार कुटुंबीयासोबत राहतात. ते कापड व्यवसायात दलालीचे काम करतात. काळबादेवीमध्ये त्यांचे कार्यालय आहे. तक्रारदार हे दहिसरमधील हरीश नावाच्या व्यक्तीला गेल्या दोन वर्षांपासून विविध व्यापाऱ्यांकडून कपड्यांचा माल घेऊन देत होते. त्यांनी मे, २०१९ ते डिसेंबर, २०२० या काळात त्यांना २९ लाख ९२ हजार ३८५ रुपये किमतीचा माल दिला. हरीश याने यापैकी फक्त ६ लाख २९ हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित २३ लाख ६३ हजार रुपये दिले नाहीत. बरेच दिवस उलटूनही हरिशकडून पैशाबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.