मुंबई - मंत्र्यांना वारंवार येत असलेल्या धमक्या लक्षात घेता आयपीएस अधिकार्यांची एक एसआयटी स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेत केली. तसेच, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना देण्यात आलेल्या धमकीचं कर्नाटक कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. त्यावरुनही, मलिक यांनी गौर लंकेश, दाभोळकर आणि पानकरे यांच्याही हत्येचं कनेक्शन कर्नाटक असल्याचं मलिक यांनी विधानसभेत म्हटलं.
कर्नाटकातून एकाने आदित्य ठाकरे यांना धमकी दिली आहे. या गंभीर विषयावर बोलताना नवाब मलिक यांनी एसआयटी नेमण्याची मागणी केली. सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणात भाजपच्या नेत्याने ट्वीटरवर ट्रेंड करण्यासाठी ३० लाख रुपये वापरले, असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला. तसेच, कलबुर्गी, दाभोळकर, गौरी लंकेश यांच्या हत्येमागे सनातनसारख्या संस्था आहेत. बऱ्याच मंत्र्यांना धमक्या येत आहेत त्याचे कनेक्शन कर्नाटकमध्ये आहे त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी सभागृहात केली. दरम्यान, नवाब मलिक यांनी मागणी केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसआयटी स्थापन करत असल्याचे जाहीर केले.