Join us  

‘काळाघोडा’ मुंबईची शान

By admin | Published: February 08, 2016 4:06 AM

मुंबईत येत्या आठवड्यात ‘मेक इन इंडिया’ सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या सप्ताहात मुंबईची शान असलेल्या काळाघोडा फेस्टिव्हलला अधोरेखित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबई : मुंबईत येत्या आठवड्यात ‘मेक इन इंडिया’ सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या सप्ताहात मुंबईची शान असलेल्या काळाघोडा फेस्टिव्हलला अधोरेखित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.रविवारी मुंबईत क्रॉस मैदानात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काळाघोडा फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘आज मुंबई ही देशाची आर्थिक व वाणिज्य राजधानी आहे. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या काळात भारतात वेगवेगळ्या देशांतून लोक येणार आहेत. या सर्वांना भारताची आणि पर्यायाने महाराष्ट्राची, मुंबईची ताकद कळण्याकरिता, मुंबईची संस्कृती आणि इतिहास यांचा मिलाफ असलेल्या काळाघोडा फेस्टिव्हलला प्रकाशझोतात आणले जाईल. या सप्ताहादरम्यान येणाऱ्यांनी काळाघोडा फेस्टिव्हलला आवर्जून यावे, यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार,’ असे फडणवीस यांनी सांगितले.सिटी आॅफ कलर्स, सिटी आॅफ ड्रीम आणि सिटी आॅफ फेस्टिव्हल म्हणून मुंबई ओळखली जाते. मुंबईकर दर वर्षी काळाघोडा फेस्टिव्हलची वाट पाहात असतात. कारण या फेस्टिव्हलमध्ये मुंबईची संस्कृती, मुंबईची परंपरा पुढे नेण्याचे काम होत असते. काळाघोडा फेस्टिव्हल हा प्रत्येकाचा असून, सर्व मुंबईकर या फेस्टिव्हलच्या रंगात रंगून जातात. या फेस्टिव्हलमुळे मुंबईची खरी ताकद दिसून येते, असेही ते म्हणाले.तरुणाईच्या विविध कलांचे प्रदर्शन करणाऱ्या ‘काळाघोडा’ महोत्सवाची सुरुवात शनिवार पासून झाली आहे. हा महोत्सव लायन गेट समोरील शहीद भगतसिंग मार्गावर सुरू आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामुळे वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. काळाघोडा महोत्सवाच्या अविरत परंपरेत तब्बल १७ वर्षांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे ‘या महोत्सवाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले, हे मी माझे भाग्यच समजतो,’ असे आवर्जून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.