मुंबई : वडाळा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आपल्या जनसंपर्क कार्यालयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचा बॅनर लावत कोळंबकर यांनी आपली दिशा स्पष्ट केली.कोळंबकर यांनी शिवसेनेमधून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. २००४ साली नारायण राणे यांनी सेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी कोळंबकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेलेले बहुतांश नेते पुन्हा शिवसेनेत परतले. मात्र, कोळंबकर राणेंसोबत एकनिष्ठ राहिले. पण आता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बॅनरवरून राणेंचाही फोटो गायब झाला असून तिथे मुख्यमंत्र्यांचा फोटो लागला आहे.भाजपा प्रवेशाबाबत कोळंबकर यांनी थेट भाष्य करण्याचे टाळले. मात्र, मतदारसंघातील विविध प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी सोडवणूक केल्याचे कोळंबकर यांनी स्पष्ट केले. मागच्या काही महिन्यांत मतदारसंघात त्यांनी लावलेल्या अनेक बॅनरवर मुख्यमंत्र्यांचे फोटो होते. तेव्हापासून ते भाजपावासी होणार अशी चर्चा होती. कोळंबकर जनसंपर्काच्या जोरावर सेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर तीन वेळा आमदार झाले. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी जागा कायम राखली. युतीच्या जागावाटपात वडाळा मतदारसंघ सेनेकडे आहे. सेनेने या जागेवरील दावा कायम ठेवल्यास कोळंबकरांच्या अडचणी वाढू शकतात.
कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 5:45 AM