बाळासाहेबांना अभिवादन करून कालिदास कोळंबकरांनी भरला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:38 AM2019-10-05T03:38:47+5:302019-10-05T03:39:23+5:30
वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कालिदास कोळंबकर यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुंबई : वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कालिदास कोळंबकर यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र या वेळी शिवसेनेचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी गैरहजेरी लावून आपला रोष व्यक्त केला. कोळंबकर यांच्या उमेदवारीला यापूर्वीच शिवसैनिकांनी ‘मातोश्री’कडे विरोध दर्शविला आहे. मात्र कोळंबकर यांनी अर्ज भरण्याआधी भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत समर्थकांचा फौजफाटा होता.
वडाळा मतदारसंघातून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका व माजी महापौर श्रद्धा जाधव इच्छुक होत्या. पक्षाने त्यांना तसे संकेत दिल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी वडाळा मतदारसंघात कामाला सुरुवात केली होती. मात्र युती झाल्यानंतर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. या ठिकाणी भाजपकडून कालिदास कोळंबकर निवडणूक लढविणार आहेत. मात्र २००५ मध्ये कोळंबकर यांनी शिवसेना सोडली होती. त्यामुळे त्यांना येथे स्थान न देता शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्याकडेच राखून ठेवावा, असे साकडे श्रद्धा जाधव व स्थानिक शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घातले होते. उमेदवारी अर्ज भरताना काढण्यात आलेल्या रॅलीत भाजपचे कार्यकर्ते व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोळंबकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. परंतु, खासदार राहुल शेवाळे धारावी येथील उमेदवाराबरोबर असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. तर श्रद्धा जाधव व स्थानिक शिवसैनिक या रॅलीकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये खदखदत असलेला राग या वेळी दिसून आला. जाधव बंडखोरी करतील, असा अंदाज व्यक्त होत होता. परंतु बंडखोरी न करता शिवसेना-भाजप उमेदवाराच्या रॅलीत गैरहजर राहून त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
वरळीतून १६ अर्ज दाखल
मुंबई : भायखळा विधानसभा मतदारसंघातून एमआयएमच्या वतीने अॅड. वारिस पठाण, काँग्रेसच्या वतीने मधुकर चव्हाण, बहुजन महा पार्टीतून रशिद खान आणि बहुजन समाज पार्टीमधून कृपाशंकर जैस्वार यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला. शिवडीतून बहुजन समाज पार्टीच्या वतीने मदन खाले, काँग्रेसमधून उदय फणसेकर आणि मनसेतून संतोष नलावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वरळी विधानसभा मतदारसंघातून आघाडीच्या वतीने अॅड सुरेश माने, बहुजन समाज पार्टीतून विश्राम पडाम आणि विद्यासागर विद्याघर, बहुजन मुक्ती पार्टीतून उत्तम जेठीथोट, वंचित बहुजन आघाडीतून गौतम गायकवाड , संभाजी ब्रिगेडमधून दिनेश महाडिक, प्रहार जनशक्ती पार्टीमधून प्रताप हवालदार यांनी अर्ज दाखल केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे. गौतम गायकवाड असे उमेदवाराचे नाव आहे. गायकवाड हे माजी पोलीस अधिकारी आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय, ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
वंचितने माजी पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी देऊन आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आदित्य हे निवडणूक लढविणारे ठाकरे घराण्यातील पहिलेच सदस्य आहेत. यासाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. मनसेनेही वरळीतून अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने बसपाचे माजी नेते अॅड. सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे.