मुंबई - लेखिका आणि स्तंभलेखिका श्वेता बच्चन नंदा यांनी मुंबईत कमलनयन बजाज हॉल अँड आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आलेल्या 'कलियुग ३.०' या पाच दिवसीय प्रदर्शनाचे उदघाटन केले. या प्रदर्शनातून जमा होणारी संपूर्ण रक्कम अक्षय पात्र फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजूंच्या पोषण आणि सक्षमतेवर खर्च करण्यात येणार आहे.
कलाकार मनसा कल्याण यांच्या अॅक्रेलिक चित्रांची सीरिज 'कलियुग'ची तिसरी आणि अंतिम आवृत्ती मुंबईत लाँच करण्यात आली आहे. १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्वेता म्हणाल्या की, मंत्रमुग्ध करणारी ‘कलियुग ३.०’ हि चित्रांची सीरिज पाहताना कलेच्या शाश्वत सामर्थ्याची जाणीव होते. मनसा कल्याणचे प्रभावी स्ट्रोक्स आणि सखोल भावना सर्जनशीलतेची एक वैश्विक भाषा असून, ती आपण सर्वांना एकत्र जोडते. हे प्रदर्शन कलाकाराच्या उल्लेखनीय प्रवासाचा आणि स्वतःच्या कलेच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याच्या क्षमतेचा पुरावा असल्याचेही श्वेता म्हणाल्या. 'कलियुग ३.०'बद्दल मनसा म्हणाल्या की, सध्याच्या युगात माणुसकीला एकमेकांमध्ये गुंतलेल्या अनेक जागतिक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर जग आणि दैनंदिन आयुष्यातील सौंदर्य प्रदर्शित करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे, असे सौंदर्य जे आजच्या पिढीकडून स्वतःच्या धकाधकीच्या जीवनात दुर्लक्षिले जात आहे. या चित्रांमधून मला समुदाय आणि व्यक्तींच्या सामूहिक विवेकामध्ये असलेली परिवर्तनाची शक्ती दाखवायची होती असेही त्या म्हणाल्या.
'कलियुग ३.०' हे कलाकाराच्या जगाविषयीच्या दृष्टीकोनाचे विस्तारित रूप आहे. एका वास्तविक अनुभवाच्या माध्यमातून आजच्या पिढीला आत्मपरीक्षणासाठी उत्तेजित करावे आणि परिवर्तनाला चालना दिली जावी हा यामागचा उद्देश आहे. कलाकार शाईन करुणाकरन यांच्याकडून गेली आठ वर्षे प्रशिक्षण घेतलेल्या मनसा यांच्या कलाकृतींचे हे तिसरे सार्वजनिक प्रदर्शन आहे.