कल्लोळ, पुणेरी, इंद्रजिमी... गुंजणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:59 AM2017-07-24T06:59:43+5:302017-07-24T06:59:43+5:30
‘मी येतोय...’ असे सांगून लाडक्या बाप्पाने आपल्या आगमनाची चाहूल दिली आहे. या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अवघ्या मुंबापुरीला दणाणून सोडणाऱ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘मी येतोय...’ असे सांगून लाडक्या बाप्पाने आपल्या आगमनाची चाहूल दिली आहे. या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अवघ्या मुंबापुरीला दणाणून सोडणाऱ्या ढोल-ताशा पथकांनीही सरावाला सुरुवात केली आहे. किंबहुना, महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सावासाठी खास विशेष सरावांचे आयोजन ढोल-ताशा पथकांकडून करण्यात येत आहे. भरपावसात मुंबई शहर-उपनगरांतील पुलांखाली या ढोल-ताशा आणि ध्वज पथकांतील तरुणाई सळसळत्या उत्साहात सराव करताना दिसते आहे.
गेल्या काही वर्षांपासून डीजेच्या संस्कृतीपासून दूर जात, ढोल-ताशाची पारंपरिक संस्कृती आपलीशी केलेल्या तरुणाईला यामुळे वेगळीच झिंग चढलेली आहे. त्यामुळे डोक्यावरील फेट्यापासून खांद्यावरील शेला, ओढणीपर्यंत निटनेटक्या पोशाखातील तरुणाई गणेशोत्सावातील मिरवणुकांमध्ये एक प्रकारचा डौल आणि जोश देत आहेत. सध्या मुंबई शहर-उपनगरांतील सायन, मानखुर्द, शिवडी, वडाळा, ईस्टर्न फ्री वे, प्रतीक्षानगर या ठिकाणी पुलांखाली ढोल-ताशा आणि ध्वज पथकांच्या सरावांना वेग आला आहे. कल्लोळ, इंद्रजिमी, माउली, घुंगरू, भीमरूपी, मेहुणपुरा अशा प्रकारचे लोकांना थिरकायला लावणारे नवीन व वैशिष्ट्यपूर्ण तालांचा सराव ही ढोल-ताशा पथके करताना दिसत आहेत. बाप्पासमोर वादनाचा मान मिळावा आणि लोकांनाही ढोल-ताशा वादनाचा निस्सीम आनंद घेता यावा, अशा विविध कारणांमुळे सध्या ढोल-ताशा आणि ध्वज पथकांच्या स्थिर वादनाचा ट्रेंड निर्माण झाला आहे.
दरवर्षी अनेक नव्या तरुण-तरुणींनी या पथकात सामील होण्याची इच्छा असते. कारण, त्यांनी त्यापूर्वी त्या पथकाचे वादन ऐकलेले असते. अशा ७०-१०० तरुण-तरुणी तरी या पथकात सहभागी होण्याच्या इच्छेने सरावांना भेटी देत असल्याचे दिसत आहेत. अशा काही हौशी आणि नव्या वादकांना प्रशिक्षण देणे आणि जुन्या वादकांसोबत सराव करण्याच्या उपक्रमाला प्रारंभ होत या पथकांमध्ये उत्साहाचे वारे दिसत आहेत. ध्वज आणि लेझीमचे वेगळे हात किंवा खेळण्याचे नवीन प्रकार या सरावादरम्यान शिकायला मिळतातच; पण ढोल-ताशा वादनातील नवे ताल, वेगळा ठेका या सरावादरम्यान आवर्जून शिकवला जातो.
या पथकांचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वेळेचे व्यवस्थापन. दोन-अडीच तास चालणाऱ्या या मिरवणुकीतील प्रत्येक मिनिटांचे नियोजन आधी केलेले असते व त्याप्रमाणेच मिरवणुकीत वेळेचे नियोजन केल्यास कित्येक तास चालणारी मिरवणूक वेळेत संपू शकते, असा संदेश देण्याचाही हेतू या नियोजनामागे आहे. तेव्हा दोन ते अडीच तासांपेक्षा अधिक वेळ त्यांचा सहभाग नसतो. ही पथके केवळ विसर्जन मिरवणुकीतच सहभागी होत नाहीत तर गणेशोत्सवाच्या दहाही दिवसांत वसाहतींमध्ये मिरवणूक काढण्यासाठी आमंत्रणे मिळतात.