वर्सोव्यातील गतिमंद कल्पस्वीची कल्पकता!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 11:19 AM2018-11-09T11:19:49+5:302018-11-09T11:39:31+5:30

वर्सोवा यारी रोड येथे राहणारी कल्पस्वी राणे हिच्यासाठी ही दिवाळी सुद्धा प्रेरणादायी व अर्थांजनाची ठरली आहे.

Kalpasvi Rane has made 1000 diya in Diwali | वर्सोव्यातील गतिमंद कल्पस्वीची कल्पकता!

वर्सोव्यातील गतिमंद कल्पस्वीची कल्पकता!

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई - दिवाळी हा प्रकाशाचा सण, मात्र अंधारावर मात करून सकारात्मक वृत्तीने वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा सण. वर्सोवा यारी रोड येथे राहणारी कल्पस्वी राणे हिच्यासाठी ही दिवाळी सुद्धा प्रेरणादायी व अर्थांजनाची ठरली आहे. मानसिक अपंगत्वावर मात करत यंदा सुद्धा कल्पस्वीने आकर्षक आणि सुबक पद्धतीने विविध प्रकारच्या पणत्या रंगवून तिने गतिमंदांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर एक आदर्श ठेवला आहे. यंदा कल्पस्वीने सुमारे 1000 पणत्या रंगवल्या. त्यांना मुंबई, नागपूर, कोल्हापूर येथे चांगली मागणी होती आणि पणत्या विक्रीतून तिला 30000 रुपयांचे उत्पन्न देखील मिळाले अशी माहिती तिची आई आणि सेंट्रल बँकेच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी नीना राणे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

कल्पस्वी ही डाऊन्स सिंड्रोम या जनकंदोषामुळे निर्माण होणाऱ्या विकाराची रूग्ण आहे. मात्र लहानपणापासून तिला रंगकामाची आवड आहे. तिचा पणत्या रंगावण्याचा सिलसिला साधारण नवीन वर्षाच्या जानेवारीत सुरू होतो. मालाड पश्चिम सोमवार बाजारातून आम्ही पणत्या आणून देतो. तिला एक पणती रंगवून दाखवली की,मग नंतर ती हुबेहूब पणत्या रंगवते. नवरात्रीपर्यंत बघता बघता तिच्या सुमारे 1000 पणत्या तयार होतात. मग यंदा तिच्या पणत्या दिवाळीत, नाताळात मिळतील का, अशी विचारणा करत विविध भागातून ,परिचितांकडून ऑर्डर मिळते. गेल्यावर्षी तर तिच्या पणत्या अटकेपार मॉरिशसला सुद्धा गेल्या होत्या. पणत्या व्यवस्थित पॅक करून आम्ही त्या पाठवतो असे नीना राणे यांनी सांगितले.

कल्पस्वीला पणत्या रंगवणे आणि त्यातून मिळणाऱ्या अर्थजनांतून मनापासून आनंद व समाधान मिळते. मात्र पैशापेक्षा तिला मिळणाऱ्या आनंदाचे आणि विशेष म्हणजे तिच्या कलेचे कौतुक होते हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याचे नीना राणे यांनी सांगितले. कल्पस्वीला लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे. घरची भिंत ही तीची कॅनव्हास होती. सुरुवातीला भिंत रंगवणे घरच्यांना त्रासदायक वाटत होते. मात्र तिची आवड लक्षात घेऊन तिला आम्ही रंगावण्याची पुस्तके, मातीची मडकी, रंगसाहित्य आणून दिले. तिचा रंगावण्याचा छंद बहरत गेला आणि गेली 5 वर्षे दरवर्षी ती आकर्षकपणे पणत्या रंगवते आणि अर्थांजन सुद्धा करते अशी प्रतिक्रिया नीना राणे यांनी शेवटी दिली.

Web Title: Kalpasvi Rane has made 1000 diya in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.