मुंबई - मुंबईसह देशातील काही राज्यांत बांधकाम उद्योगातील एक प्रमुख कंपनी असलेल्या कल्पतरू बिल्डर कंपनीने बनावट बिलांच्या माध्यमातून ६०० कोटींचा घोटाळा केल्याची माहिती पुढे आली आहे. आयकर विभागाने ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या कालावधीदरम्यान कंपनीचे मुख्याधिकारी व प्रमुख अधिकारी यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयांवर छापेमारी केली होती.
या छापेमारी दरम्यान कंपनीची अनेक कागदपत्रे आयकर विभागाने जप्त केली होती. यामध्ये कंपनीने तब्बल ६०० कोटी रुपयांची बनावट बिले तयार करत त्याचे पैसे दिल्याचे दिसून आले. हे पैसे नेमके कुणाला दिले आहेत व ते कोणत्या खात्यांवर गेले आहेत, याचा आता आयकर विभागाचे अधिकारी तपास करत आहेत. तसेच, कंपनीतर्फे कर चुकवेगिरी देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याचा विभागाला संशय असून त्या अनुषंगाने देखील अधिकारी तपास करत आहेत.