कल्याण : राज्यात एसटी कर्मचा-यांचा संप सुरू असून एसटी बांधवांना ठिकठिकाणाहून पाठींबा देखील मिळत आहे. अनेक जण बंद पुकारणा-या कर्मचा-यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील वकीलांनी सुद्धा कल्याण एसटी डेपो मधील कर्मचा-यांची भेट घेत त्यांना पाठींबा दिला.
वकील अनिरुद्ध कुलकर्णी, प्रेरणा चव्हाण व त्यांच्या टीमने कर्मचा-यांची भेट घेतली. या लढ्यामध्ये कायदेशीर बाबींसाठी वकिलांकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन देण्यात आले. कायदेशीर मार्गाने संप करावा असा सल्लाही यावेळी देण्यात आला.कर्मचा-यांच्या समस्यां, वेतनवाढ, विलीनीकरण इत्यादी समस्या वकिलांनी जाणून घेतल्या.
याशिवाय, कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदत लागली तर ती केली जाईल असही आवर्जून सांगण्यात आलं. एसटी कर्मचा-यांनी कोरोना काळातही कामं केलं. वर्षांनुवर्ष काम करूनही म्हणावी तशी पगारवाढ त्यांना मिळत नाही , त्यांच्या मागण्या रास्त आहेत असं मत ऍड अनिरुद्ध कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.