स्मार्ट सिटींमध्ये कल्याण-डोंबिवलीला ‘कोविड इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड’; केंद्राकडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 07:52 AM2021-06-26T07:52:19+5:302021-06-26T07:52:28+5:30

केंद्राकडून सन्मान : सर्वोत्कृष्ट कारभारात ठाणे दुसऱ्या स्थानी, औरंगाबादलाही ‘आयएसएसी’ पुरस्कार

Kalyan-Dombivali gets ‘Covid Innovation Award’ in Smart Cities; Honors from the Center pdc | स्मार्ट सिटींमध्ये कल्याण-डोंबिवलीला ‘कोविड इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड’; केंद्राकडून सन्मान

स्मार्ट सिटींमध्ये कल्याण-डोंबिवलीला ‘कोविड इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड’; केंद्राकडून सन्मान

Next

मुंबई : राज्यातील  कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद या तीन शहरांना विविध गटांमध्ये इंडिया स्मार्ट सिटीज कॉन्टेस्ट (आयएसएसी) २०२० हा पुरस्कार जाहीर झाला. देशात औरंगाबाद शहराने सर्वोत्कृष्ट शहर वाहतूक बस सेवेबद्दल प्रथम क्रमांक तर सर्वोत्कृष्ट कारभारासाठी ठाण्याने दुसरा क्रमांक पटकाविला. कोविड इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड या गटात कल्याण-डोंबिवली व वाराणसी यांना विभागून आयएसएसी पुरस्कार देण्यात आला. 

केंद्राच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयातर्फे शुक्रवारी  स्मार्ट सिटी मिशनच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा, संचालक कुणालकुमार यांच्या उपस्थितीत पाच वेगवेगळ्या प्रवर्गात पुरस्कारांची घोषणा झाली.  भारत सरकारने २५ ऑगस्ट २०२० रोजी देशभरातील शंभर स्मार्ट सिटींमध्ये स्पर्धांची घोषणा केली होती. स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडने यात पालिकेच्या वतीने ‘कोविड इन्होवेशन अवॉर्ड’ या गटासाठी नामांकन सादर केले होते. यात पहिल्या व दुसऱ्या फेरीनंतर ४० शहरांमधून कोविड इन्होवेशन अवॉर्डसाठी फक्त वाराणसी, कल्याण डोंबिवल , वडोदरा व आग्रा या चार शहरांची निवड झाली होती. 

‘यापुढेही सर्व मिळून प्रगती करू’ 

सांघिक भावनेने संकटाचा मुकाबला करण्याची या शहराने जोपासलेल्या संस्कृतीची केंद्र शासनाने दखल घेतली. अशीच कार्यपद्धती यापुढेही सुरू राहिल्यास सर्व मिळून प्रगती करू, असा विश्वास केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

हा नागरिकांचा सन्मान 

हा पुरस्कार म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचा सन्मान आहे. कोविड कालावधीत महापालिकेला मदत करणाऱ्या असंख्य डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच अन्य विभागातील अधिकारी - कर्मचारी, अनेक सेवाभावी संस्था, सर्व लोकप्रतिनिधी यांचा हा सन्मान आहे. कमी संसाधनामध्ये महापालिकेने या सगळ्यांच्या सहकार्याने चांगला लढा दिला आहे.
- डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त.

औरंगाबाद अव्वल स्थानी 

औरंगाबाद स्मार्ट सिटीला ‘माझी स्मार्ट बस’साठी प्रथम पुरस्कार घोषित करण्यात आला. सुरत शहराला ‘डायनामिक शेड्युलिंग ऑफ बस’साठी दुसरा तर अहमदाबाद शहराला ‘ऑटोमेटेड पार्किंग सिस्टिम’साठी तृतीय पुरस्कार घोषित केला.  
 

Web Title: Kalyan-Dombivali gets ‘Covid Innovation Award’ in Smart Cities; Honors from the Center pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.