कल्याण : गणेशोत्सवात केलेली डागडुजी अल्पावधीतच उखडली गेल्याने रस्त्यांच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेला ‘क’ वर्गात मिळालेल्या बढतीच्या पार्श्वभूमीवर ‘दर्जा वाढला मात्र गुणवत्ता कधी सुधारणार’ असा सवाल शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपस्थित होत आहे.केडीएमसी क्षेत्रांतर्गत ३३५ किमीचे रस्ते असून यात कल्याणमधील २२ आणि डोंबिवलीतील ३५ प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. रस्त्यांचे डांबरीकरण आणि डागडुजी यासाठी वर्षभरात तब्बल २१६ कोटी ८९ लाख १९ हजार रुपये मंजूर केले आहेत. यात खोदलेले चर भरण्यासाठी ८ कोटींच्या तरतुदीबरोबरच पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या डागडुजीकामी १२ कोटी रुपयांच्या तरतुदीचा समावेश आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. परंतु, या अर्धवट कामांमुळे यातील बहुतांश रस्ते खड्ड्यांत गेले आहेत़ दरम्यान, गणेशोत्सवात प्रसिद्धिमाध्यमांमधून टीका झाल्यानंतर महापालिकेने रस्त्यांच्या डागडुजीचे काम हाती घेतले. ही टीका महापालिकेचे सत्ताधारी आणि प्रशासनाच्या एवढी जिव्हारी लागली की, भर पावसातही खड्डे बुजवण्याचे काम सुरूच ठेवले होते़ अखेर, व्हायचा तोच परिणाम झाला. एरव्ही, लख्ख उन्हात केलेल्या रस्त्यांवर भरमसाट खड्डे पडण्याचा अनुभव गाठीशी असताना भर पावसात केलेले डांबरीकरण कितपत टिकू शकते, हा साधा विचारही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना करावासा वाटला नाही. याचीच परिणती डांबरीकरण केलेल्या रस्त्यांच्या दुर्दशेमध्ये झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)
कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांची धूळधाण
By admin | Published: September 12, 2014 1:32 AM