कल्याण डोंबिवलीला लवकरच अतिरिक्त पाणी
By admin | Published: April 8, 2015 12:18 AM2015-04-08T00:18:47+5:302015-04-08T00:18:47+5:30
कल्याण डोंबिवली शहरात पाणी टंचाई भेडसावत असताना या शहरांसाठी लवकरच १४० एमएलडी अतिरिक्त पाणी दिले जाईल असा दिलासा जलसंपदा
कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात पाणी टंचाई भेडसावत असताना या शहरांसाठी लवकरच १४० एमएलडी अतिरिक्त पाणी दिले जाईल असा दिलासा जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिला आहे. मंगळवारी पाणीप्रश्नावर मंत्रालयात विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी महाजन यांनी हे आश्वासन दिले.
कल्याण डोंबिवली शहरासाठी उल्हासनदीतून पाणी उचलले जाते. केडीएमसी क्षेत्रासाठी २३४ एमएलडी कोटा आरक्षित केला आहे. दरम्यान कल्याण पुर्वेत पाणीटंचाईची समस्या मोठया प्रमाणावर उदभवली आहे. यावरून महापालिकेच्या महासभा तीनवेळा तहकूब झाल्या आहेत. पुरेसा पाणीपुरवठा करू या प्रशासनाच्या आश्वासनानंतरही यात सुधारणा झालेली नाही. या पार्श्वभुमीवर मंगळवारी मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जलसंपदामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह आमदार संजय दत्त, अप्पा शिंदे, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, रविंद्र चव्हाण या कल्याण डोंबिवली परिसरातील आमदारांसह आयुक्त मधुकर अर्दड यांनी उपस्थिती लावली होती. बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू असून हे काम मे अखेरपर्यंत पुर्ण होईल त्यानंतर जे अतिरिक्त जमा होणारे पाणी केडीएमसीला उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले. आता ते प्रत्यक्षात कधी उतरते, याकडे समस्त कल्याण-डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.
(प्रतिनिधी)