देशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 11:35 AM2018-05-24T11:35:21+5:302018-05-24T11:35:21+5:30
भारतीय रेल्वेने 11 मे ते 17 मे या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबई- देशातील तीन सर्वात जास्त रहदारीच्या स्थानकांनी आता सर्वात अस्वच्छ स्थानकांचाही दर्जा मिळविला आहे. मुंबईतील कल्याण, कुर्ला आणि ठाणे ही तीन रेल्वे स्थानकं सर्वात अस्वच्छ स्थानकं असल्याची नोंद झाली आहे. भारतीय रेल्वेने 11 मे ते 17 मे या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये कानपूर रेल्वे स्थानक पहिल्या क्रमांकावर आहे. कानपूर रेल्वे स्थानक सर्वात अस्वच्छ असल्याची नोंद झाली आहे. या सर्वेक्षणात मुंबईतील तीन स्थानकांचा समावेश आहे. दहा अस्वच्छ स्थानकांच्या यादीत कल्याण स्थानक तिसऱ्या स्थानी, लोकमान्य टिळक टर्मिनस पाचव्या स्थानी आणि ठाणे स्टेशन आठव्या स्थानी आहे.
कल्याण स्थानकावरून दिवसाला अडीच लाख लोक प्रवास करतात. नव्वद लांब-पल्ल्याच्या गांड्याची ये-जा असते. तर दररोज 572 लोकल ट्रेन्स कल्याण स्थानकावरून जातात. यापैकी 58.74 टक्के प्रवाशांनी कल्याण स्थानकावरील स्वच्छतेबद्दल समाधानी नसल्याचं सांगितलं.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या ट्रेन आणि स्थानकावरून सुविधा सुधारण्यासाठी रेल्वेने प्रवाशांकडून अभिप्राय मागितला होता. रेल्वे प्रशांच्या मोबाइल नंबरवर फोन करून त्यांच्याकडून अभिप्राय मागविले होते. प्रवाशांनी तिकिट बुकिंगच्या वेळी दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करण्यात आला. ट्रेन व स्थानकातील स्वच्छता, खाण्याची सोय, एसी, अन्न-पदार्थ, वक्तशिरपणा आणि ट्रेनमधील बिछाने अशा सहा मुद्द्यांवर अभिप्राय मागितला होता. त्या सर्वेक्षणानंतर अस्वच्छतेबद्दलची ही बाब समोर आली आहे.
दुर्गंधीमुळे क्षणभरही उभे राहणे मुश्कील
कल्याण रेल्वेस्थानकात पाऊल ठेवताच रेल्वेमार्गातील विष्ठा, कचरा यामुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना तेथे क्षणभरही उभे राहावेसे वाटत नाही. मोठमोठ्या घुशी रेल्वेमार्ग, फलाटावर वावरत असतात. कोपरे, भिंती यावर पान, तंबाखू खाऊन पिचकाºया मारलेल्या असतात. लांब पल्ल्यांच्या दररोज अडीचशे गाड्यांची होणारी वाहतूक, तर कर्जत-कसाऱ्याकडे जाणाऱ्या उपनगरीय लोकलच्या ८०० फेऱअया यामुळे दिवसभर या स्थानकात कमालीची गर्दी असते. रात्रीच्यावेळी या स्थानकाचा ताबा भिकारी, गर्दुल्ले, भटके कुत्रे घेतात. त्यामुळे देशभरातील सर्वाधिक घाणेरड्या रेल्वेस्थानकांच्या यादीत कल्याणचा लागलेला तिसरा क्रमांक ही आश्चर्याची नव्हे तर खेदाचीच बाब आहे.
अस्वच्छतेचा शिक्का ठाणेकरांना झोंबला
अन्य रेल्वे स्थानकांच्या तुलनेत ठाणे रेल्वेस्थानकाच्या साफसफाई व स्वच्छतेकडे लक्ष देऊनही अस्वच्छ रेल्वेस्थानकांच्या यादीत ठाणे स्थानकाने आठवा क्रमांक पटकावल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबरच काही प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, दररोज आठ लाख प्रवासी प्रवास करत असलेल्या या स्थानकाबाबत सारेकाही आलबेल अजिबात नाही. तब्बल ११ फलाट असलेल्या या स्थानकाच्या काही कोपºयांमध्ये अस्वच्छता, भिकारी, गर्दुल्ले, प्लास्टिक कचरा आढळतोच.