घाटातील बोगद्याने अडवली कल्याण-नाशिक लोकलची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 05:44 AM2019-03-02T05:44:37+5:302019-03-02T05:44:39+5:30
सुरक्षेच्या कारणास्तव प्रकल्प रखडला : पुश-पूल किंवा मेमूने मार्ग जोडण्याचे विचाराधीन
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून कल्याण-नाशिक लोकल धावणार की नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. कारण कल्याण-नाशिक लोकलची वाट घाटातील बोगद्याने अडवली आहे. घाटावरून रेल्वे चालवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. प्रवाशांची सुरक्षा ही रेल्वेची प्राथमिक जबाबदारी असल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत असल्याने कल्याण-नाशिक लोकल तूर्तास तरी रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कल्याणहून नाशिक आणि पुणे लोकल सेवा सुरू होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आलेले पाहायला मिळत नाही. परिणामी कल्याण-नाशिक इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट्स लोकल ‘फेल’ जाण्याची शक्यता आहे. घाट मार्गातील बोगद्याच्या ठिकाणी कल्याण-नाशिक लोकल चढण्यास जादा शक्ती लागते. यासह बोगद्याच्या ठिकाणांतून जाताना जादा गर्दी असलेली लोकल सुरक्षेच्या कारणास्तव शक्य नसल्याने या लोकल सेवेचा प्रकल्प रखडला आहे.
लोकल मागील महिनाभरापासून कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे. या लोकलची चाचणी घेण्यात येत आहे. मात्र चाचणीचा निकाल काय लागला, याबाबत मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.
कल्याण-नाशिक लोकल सेवा इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट्समधून सुरू होत नसल्यास पर्यायी सुविधा म्हणून बँकर, पुश-पूल किंवा मेमूने कल्याण-नाशिक मार्ग जोडण्याचे विचाराधीन असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत तोडगा निघाल्यानंतरच ही सेवा सुरू करण्यात येईल.
सूचनेनुसार बदल
रिसर्च स्टॅण्डर्ड अॅण्ड डिझाइन आॅर्गनायझेशन (आरडीएसओ)ने या कल्याण-नाशिक, कल्याण-पुणे लोकलसाठी विशेष बदल करण्याची सूचना दिली आहे. त्याप्रमाणे चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीतून अत्यावश्यक ब्रेक सिस्टीम, उच्च दाब शक्ती, ३२ चाकांना पार्किंग ब्रेकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कुर्ला कारशेडमध्ये दाखल झालेल्या या लोकलची चाचणी घेण्यात आली असली तरी चाचणीतील निष्कर्ष गुलदस्त्यात आहे.