Join us  

कल्याण लोकसभा लढवायची अन् जिंकायची; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 7:32 AM

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा मातोश्री निवासस्थानी घेतला.

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण मतदारसंघावर आपल्या उमेदवारासह निवडणूक लढण्याची तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. कल्याण मतदारसंघावर आपल्या शिवसेनेचा पगडा आजही कायम आहे. त्यामुळे ही जागा लढवायची आणि जिंकायचीच, असा निर्धार शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा मातोश्री निवासस्थानी घेतला. यावेळी ठाकरे गटाचे कल्याणमधील पदाधिकारी उपस्थित होते. हा मतदारसंघ १९९६ साली भाजपकडून आपण भांडून घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीतसुद्धा ही लोकसभेची जागा आपण लढून हा मतदारसंघ शाबूत ठेवायचा आहे. समोरच्याची ताकद कितीही असू द्या, तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून प्रचार करा. स्थानिक पदाधिकाऱ्यांना भेटून आपली संघटना आणखी मजबूत करा. इंडिया आघाडीचे यजमानपद आपल्याकडे होते. त्यामुळे मला काही ठिकाणी दौरे करावे लागतील, उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेश्रीकांत शिंदे