कल्याण, तसेच प.रेल्वेवरून कोकण रेल्वेवर गाड्या हव्या,एल्गार परिषदेत मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:02 AM2020-01-06T06:02:21+5:302020-01-06T06:02:27+5:30
पश्चिम रेल्वेमार्गावरून दररोज कोकण रेल्वेवर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या एल्गार परिषदेत रविवारी करण्यात आली.
मुंबई : कल्याण आणि डहाणू रोडवरून सावंतवाडीसाठी आणि नायगाव जंक्शनचे काम लवकर पूर्ण करून पश्चिम रेल्वेमार्गावरून दररोज कोकण रेल्वेवर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या एल्गार परिषदेत रविवारी करण्यात आली. त्यांची पूर्तता न केल्यास २६ जानेवारीला उपोषण करण्याचा इशारा परिषदेतून देण्यात आला.
दादरच्या सावंतवाडी संस्थान मराठा सभागृहात कोकण रेल्वे प्रवाशांनी एल्गार परिषद आयोजित केली होती. या वेळी कोकण रेल्वे प्रवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. पश्चिम रेल्वेमार्गावरून सुट्टीकालीन एक्स्प्रेस चालविण्यात येतात. मात्र, दैनंदिन एक्स्प्रेस चालविण्यात येत नाहीत. मध्य रेल्वेमार्गावरील कोकण रेल्वेवर गर्दीचा ताण जास्त असतो. हा ताण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेमार्गावरील वांद्रे टर्मिनसहून दैनंदिन मेल, एक्स्प्रेस सुरू करणे आवश्यक आहे. कोकणवासीयांना होळी, गणपती, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विशेष गाड्या चालविण्यात येतात. त्यामुळे कोकणवासीयांना पश्चिम रेल्वेमार्गावरून प्रवास करणे सोईस्कर होते. अशाच प्रकारची कायमस्वरूपी सुविधा पश्चिम रेल्वेमार्गावरून सुरू करावी. पश्चिम रेल्वेमार्गावरील वांद्रे टर्मिनस ते सावंतवाडी, मडगावपर्यंत दैनंदिन मेल, एक्स्प्रेस सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
तुतारी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांची तिकीट प्रतीक्षायादी ५०० ते १ हजारपर्यंत असते. या प्रवाशांच्या सोयीसाठी जादा एक्स्प्रेस चालविणे आवश्यक आहे, असे कोकण रेल्वे जागृत संघाचे कार्याध्यक्ष नितीन गांधी म्हणाले.
डहाणू-पनवेल मेमू गाडीची फेरी चिपळूणपर्यंत नेण्यात येण्याची मागणी करण्यात आली. उत्तर-दक्षिण भारतात धावणाऱ्या एक्स्प्रेसला खेड, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यापैकी प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानकावर थांबा दिला पाहिजे, तुतारी एक्स्प्रेसमध्ये महिलांसाठी राखीव डबा लावण्यात यावा, कोकण रेल्वेमधील स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येण्याची मागणी करण्यात आली.
>कोकण रेल्वेचे कार्यालय कोकणात स्थलांतरित करा!
भारतीय रेल्वेमधील प्रत्येक विभागाचे मुख्य कार्यालय त्या विभागाच्या रेल्वेच्या हद्दीत आहे. मात्र, कोकण रेल्वेचे मुख्य कार्यालय हे कोकण रेल्वेच्या हद्दीत नाही. हे कार्यालय बेलापूर येथे आहे. त्यामुळे या कार्यालयासाठी आतापर्यंत भाडे स्वरूपात शेकडो रुपये खर्च केले आहेत. हे कार्यालय कोकण रेल्वेच्या हद्दीत आणावे. त्यामुळे आपल्या समस्या प्रवाशांना मुख्य कार्यालयात जाऊन मांडता येतील, असे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी. के. सावंत म्हणाले.