Join us

‘कामा’ तरुणीच्या पोटातून काढला साडेसहा किलोचा ट्यूमर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 2:05 AM

२०१६ साली या तरुणीच्या गर्भाशयाला गाठ होती, त्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

मुंबई : कामा रुग्णालयात अवघ्या २४ वर्षीय तरुणीच्या पोटातून तब्बल साडेसहा किलोचा ट्यूमर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. एक वर्षापासून या तरुणीच्या गर्भाशय, आतडे आणि यकृत अशा अन्य अवयवांजवळ हा ट्यूमर पसरला होता.

या ट्यूमरमुळे त्या तरुणीच्या दैनंदिन जीवनातही अडथळा निर्माण होत असल्याने अखेर कामा रुग्णालयातील युरोलॉजी विभाग प्रमुख डॉ. व्यंकट गीते आणि स्त्रीरोगतज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ. विलास कुरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आशा रहेजा, डॉ. चिंचोरिय्या, डॉ. वैशाली मोहोड यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.

२०१६ साली या तरुणीच्या गर्भाशयाला गाठ होती, त्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही ही गाठ पोटात आणि कमरेच्या काही भागात पसरत असल्याचे लक्षात आले. त्या वेळी खासगी रुग्णालयात उपचार परवडत नसल्याने ती कामा रुग्णालयात दाखल झाली. त्यानंतर वैद्यकीय चाचणीत ही गाठ लिओमयोमा असल्याचे निदान झाले. या शस्त्रक्रियेनंतर ट्यूमरचेनमुने तपासाकरिता पाठविण्यात आले होते, त्यात तो स्पिंडल सेल असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया करून त्या तरुणीच्या पोटातून ६.५ किलोचा ट्यूमर बाहेर काढला. या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात जवळपास ५ ते ७ लाख रुपयांचा खर्च आला असता. मात्र, कामा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.

टॅग्स :हॉस्पिटल