कामा रुग्णालयात खाटांची क्षमता वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:07 AM2021-05-12T04:07:00+5:302021-05-12T04:07:00+5:30
मुंबई : कामा रुग्णालयात सध्या ३३० रुग्णांची क्षमता आहे. कोविड काळात या रुग्णालयात १०० खाटा कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या ...
मुंबई : कामा रुग्णालयात सध्या ३३० रुग्णांची क्षमता आहे. कोविड काळात या रुग्णालयात १०० खाटा कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. कोविड विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता या रुग्णालयात कोविडसाठी अधिकच्या १०० खाटा वाढविण्यासंदर्भातील नियोजन करण्यात यावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी दिले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणाले, गेल्या सव्वा वर्षात या रुग्णालयात कोविडची लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने अजून १०० खाटा म्हणजेच एकूण २०० खाटा कोविड रुग्णांसाठी ठेवण्याचे नियोजन करण्यात यावे. मात्र हे नियोजन करीत असताना येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याबाबतचेही नियोजन करण्यात यावे. कामा रुग्णालयात पहिल्यांदाच इन्टेंसिव्ह केअर युनिटबरोबरच हाय डिपेंडन्सी युनिट सुरू केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
लसीकरणासाठी स्वतंत्र पथक करावे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नागरिक लसीकरणासाठी गर्दी करू शकतात हे लक्षात घेऊन लसीकरणासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात यावे. यामध्ये स्वतंत्रपणे नागरिकांचे नोंदणीकरण, लस देण्याबाबतचा तपशील यांचा समावेश करण्यात यावा. कामा रुग्णालयामध्ये याबाबत स्वतंत्र पथक करण्यात आले असल्याबाबतची माहिती देशमुख यांना या वेळी देण्यात आली.